Posts

कोयना-

Image
  को य ना सुडौल ही तरंगिणी सुरम्य कोयना पहा घडा भरून गच्च जाय नार भासते अहा! बटा हवेवरी जशा भुरू भरू तरंगती तरंग हे जळावरी तसे सुरम्य वाहती ----- 1   वळे प्रवाह नागमोड संगतीस तीर ही जशाच नर्तिका कुणी एकसाथ नाचती प्रगाढ सख्य ये दिसून नीर तीर ह्या मधे करांस गुंफुनी जशा सख्याच चालल्या दिसे ----- 2   न उच्च नीच भेद हा दिसेच पातळीमधे प्रवाह आणि काठ हे समान पातळीमधे मधेच रूपवान नीलनीरवस्त्र कोयना पाचुची किनार दोही बाजुला मनोरमा ----- 3     शकुंतलेस धाडण्या पतिगृही जशा तिच्या करी प्रवास दूरचा सख्या तिच्यासवे जशा परस्परांचिया गळ्यात घालुनी गळे सुखे करांस ठेउनीच स्कंदि एकमेकिच्या सवे ----- 4   सुकेशिनी निघे तशीच कोयना पतीकडे सुहासिनी सुदर्शना तिच्याच ह्या सख्यांसवे तिच्यावरी धरेच छत्र नील अंतराळ हे द्रुमावली बघे स्वतःस निर्मला जलामधे ----- 5   निमग्न नर्तनी सख्या; प्रवासही न थांबता कितीक काळ थांबुनी पहात राहले मुदा विलोभनीय रूप ते ठसे मनात माझिया अजून नेत्र चित्त हे करीच चिंतना तिच्या ----- 6 -------...

INCHCAPE ROCK मृत्यूचा कातळ

Image
  INCHCAPE   ROCK      मृत्यूचा कातळ  माझी मैत्रिण विनयानी मला एक सुंदर कॅलेंडर भेट म्हणून दिले . श्री. भास्कर सगर हया अत्यंत निष्णात चित्रकाराने भारतातील विविध दीपस्तंभांची चित्रे त्यावर अत्यंत सुंदर चितारली आहेत. खूप आवडली मला ती दिनदर्शिका. माझ्या कॉम्प्युटर टेबलवर विराजमानही झाली लिहीताना सतत समुद्रात मार्गदर्शक ठरणारे ते दीपस्तंभ पहात असताना मला आपल्याला शाळेत   असलेली   INCHCAPE ROCK कविता आठवत होती. INCHCAPE ROCK हे Robert Southey ह्या1802 मधे प्रकाशित केलेले कथात्मक गीत (Ballad)   आहे. स्कॉटलंडच्या पूर्व किनार्‍यापासून 18 कि.मि. वर समुद्राखाली वाळुचे किंवा प्रवाळाचे खडक आहेत. INCHCAPE ROCK म्हणजे ज्याच्यावर मधमाशांच्या पोळ्यासारखी षट्कोनी नक्षी आहे असे.   असे खडक हे प्रवाळाचे असतात. पाण्याखाली असलेले हे खडक न दिसल्यामुळे अनेक जहाजं ह्या प्रवाळ खडकांवर आपटून फुटत.   म्हणून तेथील अ‍ॅबरब्रॉथक हया मठाधीशाने त्यावर एक सतत सूचना देत राहील अशी एक घंटा लावून ठेवली. येथील सर राल्फ द रोव्हर नावाच्या एका समुद्र चाच्याने त...

सूर्योदय

Image
  सू र्यो द य असे तेज ना दुजे पाहिले, खुजी सर्व तेजे धगधगणारी अनलप्रभाहि, त्या पुढती लाजे काय सोहळा काय दिमाखचि, रोज रोज गाजे अरुणध्वज हा क्षितिजावरती प्रवेशता वेगे -----1   क्षणाक्षणाला रंग साजिरे उषा रंगवीते रोज नव्या रंगानी नभ हे, उजळत नित जाते उत्कंठित मन नभपटलावर चित्र रोज पाहे जशी सजावट आज होतसे, उद्या तशीच नसे -----2   रंगहीन हे जग अंधारे, रंगत जाई न्यारे नव रंगानी सजून अवनी, सज्ज स्वागतास्तवे पायघड्यांस्तव उलगडले जणु गालिचे मखमली सोनवर्ख सजवितो पाकळ्या गुलाब गुलबक्षी ----- 3   ऋतूप्रमाणे पुष्प कमानी नव्या नव्या सजती मोहक सुंदर धुंद परिमळे अलि गुंजन करिती स्वागत गीते रोज नवनवी, भाट रवीचे गाती राहति गुंजत स्वर मधुर सुखे रोज आसमंती ----- 4 सप्तरंगि हे तुरंग अबलख, रथ घेऊन येती रथी बैसला सहस्ररश्मी स्वामी जगत्पती प्रभा तयाची सहस्र योजन पसरे सोनेरी प्रतिभा हाची सुयोग्य परिचय प्रतिभावंतासी ----- 5 ---------------------------------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित- विश्वावसू ,चैत्र शु. तृतीया (गौरीची तीज)  31म...

पहिली कविता

Image
  प हि ली क वि ता जुलमी सत्ताधीश आतपी, लुटून नेई अवघी अवनी अश्रू सुकुनी गालावरती कोमेजुन मुखमंडल जाई --- ।। 1 ( आतपी – सूर्य, अवनी- पृथ्वी )   मरुद्गणांची साथ रवीसी लुटण्या वैभव धनसम्पत्ती धुळीत माखुन गेली अवघी वसुंधरा ती अती लाघवी --- ।। 2     निराधार त्या वसुंधरेसी उरे न त्राता जगती कोणी कढ दुःखाचे गिळता गिळता हृदय विदीर्ण शतखंडच होई --- ।। 3   आक्रमणाने पीडित वंचित अबोल झाली; खिन्न तिचे मन धरणी टाकी उष्ण उसासे सर्पिण जखमी जशी फुसफुसे --- ।। 4 विष भरल्या त्या उच्छ्वासांनी मरणाचे थैमान भोवती दुःखी होती मुले माणसे, पशू पक्षि द्रुम-लताचि खासे  --- ।। 5   अभाग्यास ना पुसे कुणीही त्यजति   जळत्या तरुसी   द्विजही दारिद्र्याचा येता फेरा चुकविति त्याला जिवलग साथी  --- ।। 6   अवचित येई झुळुक सानुली घाली  फुंकर  जखमेवरती  ‘‘मरणानंतर दुजे मरण ना’’ देई विश्वासाने ग्वाही --- ।। 7   ‘‘उरे न काही जेव्हा लुटण्या भय लुटण्याचे कशास चित्ता गळून पडता ...

दिव्यांची रांग

Image
  दिव्यांची रांग उत्तर भारतातल्या कोहरा ह्या भयंकर प्रकाराची उग्रता आणि व्याप्ती कमी होत, आपल्याकडे त्याची पातळी धुक्यावर थांबते. महाराष्ट्रातही घाटात, जंगलात, कोकणात, पहाटेच्या प्रवासात धुक्यात हरवलेले रस्ते मनाला छान वाटत असले तरी, गाडी चालवताना रस्त्याची जाणीवही पुसून टाकतात. डोळे असून अंधळे करून टाकतात. नेहमी खाली डोकावताना धडकी भरवणार्‍या दर्‍यांचे खड्डे बुजवून, माना वर करून बघायला लावणार्‍या उंचच उंच डोंगररांगांना बुडवून, ‘मी किती हिरवागार सुंदर’ म्हणणार्‍या उंच वृक्षराजीला पुसून टाकून, सूर्यालाही मुठीत बंद करून सगळ्या सृष्टीच्या अहंकाराला लिंपून घेणारं हे धुकं सर्वांना असून नसल्यासारखं करून टाकतं. ह्या दाट धुक्यात झेंडा घेऊन सैन्याच्या अग्रभागी चालणार्‍या बिन्नीच्या घोडेस्वारासारखी मिणमिणती दिव्यांची रांग सर्वाना  रस्त्याचा  अंदाज देत राहते. दिव्यांची रांग धुक्यात हरवली वाट शोधते दूर दिव्यांची रांग तटस्थतेने उभे पथावर दिनरात दिव्याचे खांब धुके लोळते रस्त्यावरती, जणू घेउनिया भांग अलगद पडते भूवर त्याचे जडावलेच प्रत्येकांग असीम महौदधीच्या येती लाटांवरती ला...

मायबोली-

Image
  मायबोली- तुझी तर्जनी माय आधार माझा तुझ्या संगती चालतो मार्ग सारा नसे माहिती तू मला घेऊनी गे कुठे चालली गाव तो कोणता गे   परी मागुती मी तुझ्या चालताना न शंका न भ्रांती न भीती मनाला गमे स्वर्ग माझ्याच आहे मुठीते कशाची कमी वाटते ना मनाते   किती शब्दलेणी मला घालुनीया सुशोभीत केले तुझ्या ह्या मुलाला कळावी कशी माउलीचीच माया करे माय ते गोड वाटे तयाला   अगे बोलतो बोबडे बोल मी जे जसे बोलवी तूच तैसे मुखाने कसा मीच निर्भीड गर्दीतही गे तुझा हात हाती धरोनीच चाले   परी माय गर्दीत सोडू नको गे तुझ्यावीण बोलू शके मी कसा गे जरी हात गेला सुटोनी कधीही पुन्हा लेकरा माय कैसी मिळावी   अगे माय माझी मराठी सुवर्णी अडे शब्द माझा तुझ्यावीण कंठी असे हात हाती तुझा जोवरी गे दिमाखात मी तोवरी बोलतो गे --------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित- 27 फेब्रु. 2025

उद्दिष्ट

Image
  उ द्दि ष्ट प्रवाहासवे वाहती काटक्या ह्या कुणी ह्या तरूच्या; कुणी त्या तरूच्या कुणी वाळलेल्या, कुणी मोडलेल्या गळाल्याच ज्या भार वृक्षास झाल्या ----- 1   तरू सोडता व्यर्थ झाले जिणे ते असो येथ वा तेथ बेवारसाचे जळाची दिशा, वेग वा भोवर्‍यांनी कधी वाहती वा किनार्‍यास येती ----- 2   न राहे तयांसीच उद्दिष्ट काही न अस्तित्त्व त्यांचे कुणा मान्य होई मतीला असे पायबंदी जळाची प्रवाही पडे त्या गती ना स्वतःची ----- 3   परी पाणपक्षीच चोचीमधूनी तयांसीच एकेक गोळा करूनी निवारा करी पाणवेलींवरी त्या जळी भासती बेटुली पाचुची ज्या ----- 4   तरंगे तरंगांवरी तो निवारा सदा ओंजळी घेऊनी पक्षिबाळा तयांच्याच छोट्या पदाने सुखावे पसाराच तो वाळल्या काटक्यांचा ----- 5   कशा पाणवेली, कुठे काटक्या त्या तिरस्कार ज्यांचा जगानेच केला नवा अर्थ त्यांच्या मिळे जीवनासी घडे देखणी काटक्यांची हवेली ----- 6 ------------------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित माघ कृ. चतुर्थी 16 फेब्रु.2025