माया

 

माया - 


मार्कंडेय ऋषींनी भगवंताला प्रसन्न करून घेतले आणि भगवंताची माया पाहण्याची इच्छा व्यक्त केली. भगवंत हसले. तथास्तु म्हणून अंतर्धान  पावले. तेवढ्यात सोसाट्याचा भीषण वारा सुटला. मुसळधार पाउस पडून नद्यांना पूर आला. सर्व जग त्या प्रलयात बुडते की काय असे वाटत असताना एका लाटेच्या तडाख्यात मार्कंडेयही वाहून गेले. नाकतोंडात पानी शिरत असतानाच महापुरात एक वडाचं झाड निश्चल उभे होते. त्याची पारंबी मार्कंडेयाच्या हाती आली. प्राणसंकट भयाने मार्कंडेय ऋषी ती पारंबी धरून कसेबसे जीव वाचवून उभे असता त्यांना त्या वडाच्या पानावर एक छोटासा बालक पायाचा अंगठा मुखात घालून  आनंदाने खेळतांना दिसला.

इतक्या भीषण प्रलयात हसणार्‍या त्या बालकाकडे ते मन हरपून पहात असताना त्यांना एक अजब गोष्ट दिसली. त्या शिशुने श्वास घेताच सारे विश्व त्याच्या श्वासासोबत त्याच्यात सामावले जात होते. तर त्याच्या उच्छ्वासासवे सारे विश्व परत बाहेर येत होते.अघटितघटनापटीयसी माया’ अशक्य असेल ते शक्य करून दाखवते ती माया पाहून मार्कंडेय ऋषी अचंबित झाले

 ‘‘वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि’’ (वटवृक्षाच्या पानावरती , बालमुकुंदचि झोपे त्यासी । नित स्मरतो मी माझ्या हृदयी)  म्हणून त्या बालकास वारंवार नमन करू लागले.

आपल्यालाही इतके साली प्रलय होणार, जगबुडी होणार ह्या भीतीखाली जगातले कोणी ना कोणी अमूक तारीख तमूक दिवसाचा हवाला देउन भूतभविष्यवादी घाबरवत असतात. पण भिऊ नकोस, इवल्याशा बालमुकुंदाच्या श्वासातून आत गेलेलं विश्व जसच्या तसं कदाचित जास्तच तजेलदारपणे त्या प्रलयातून बाहेरही येणार आहे. असाही शब्दांच्या  पलिकडचा अर्थ असावा का? हे आश्वासक सत्य फक्त  आपलीच संस्कृती सांगते

 

मनास माझ्या डसते काही । मनात माझ्या खुपते काही

मनात दुखते मनात सलते । परी मनातचि हसते काही

 

मनात माझ्या जळते काही । परी मनातचि लेप चंदनी

मिटते पुसते मनात काही । फिरुन नव्याने उमटे काही

 

मनात हुळहुळतेची काही । भळभळते अन गळते काही

परि मनात झळझुळते काही । मनात नित सळसळते काही

 

झाकोळुन ये मनात काही । मनात येई उजळुन काही

मृत्तिकेतुनी अंकुर यावा । मनात तैसे उकले काही ।

 

 

आकाश जसे सामावे सहजी । तृणांकुरावर दवबिंदूतची

तसे घडे जे विश्वामाजी । प्रतिबिंबित ते मनात होई

 

 

मनात कसला भणाण वारा । झुंबड मेघांचाच दरारा

कडकडाट तो सौदामिनिचा । कादंबिनिच्या भीषणधारा

 

पाणलोट वेगाने नेती । प्रवाहास जे लागे हाती

उखडुन उपटुन खेचुन लोटुन । डोंगर झाडे घरे राहती

 

आक्रोश उठे गगनी भुवनी । प्रलयाचे हो तांडव अजुनी

चहुबाजूनी भीषण लाटा । आधारा ये वटपारंबी

 

ऊर धपापत बघता बघता । चित्र पालटे क्षणात भवती

जलबिंदू तो इवलासा का । वटपत्रावर हसतो पाही

 

पिसाटलेल्या निसर्गातही । बालमुकुंदासम आह्लादक

वटपत्रावर तेजस्वी तो । विश्व जयात प्रतिबिंबित होइ

 

अक्षय वटतरुच्या पानावर । मन-मुकुंद मज माया शिकवी

दवबंदूसम मन बिंदु मम । झुलतो तनुच्या देठावरती

 

श्वासासोबत सार्‍या विश्वा । भरून घेई हृदयामाजी

लिहिता लिहिता निःश्वासातुन । अलगद विश्वचि ये बाहेरी

---------------------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

12 जुलै 2025

 

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

कवठ -

कुंद