सूर्योदय
सूर्योदय
असे तेज ना दुजे पाहिले, खुजी सर्व तेजे
धगधगणारी अनलप्रभाहि, त्या पुढती लाजे
काय सोहळा काय दिमाखचि, रोज रोज गाजे
अरुणध्वज हा क्षितिजावरती प्रवेशता वेगे -----1
क्षणाक्षणाला रंग साजिरे उषा रंगवीते
रोज नव्या रंगानी नभ हे, उजळत नित जाते
उत्कंठित मन नभपटलावर चित्र रोज पाहे
जशी सजावट आज होतसे, उद्या तशीच नसे -----2
रंगहीन हे जग अंधारे, रंगत जाई न्यारे
नव रंगानी सजून अवनी, सज्ज स्वागतास्तवे
पायघड्यांस्तव उलगडले जणु गालिचे मखमली
सोनवर्ख सजवितो पाकळ्या गुलाब गुलबक्षी ----- 3
ऋतूप्रमाणे पुष्प कमानी नव्या नव्या सजती
मोहक सुंदर धुंद परिमळे अलि गुंजन करिती
स्वागत गीते रोज नवनवी, भाट रवीचे गाती
राहति गुंजत स्वर मधुर सुखे रोज आसमंती ----- 4
सप्तरंगि हे तुरंग अबलख, रथ घेऊन येती
रथी बैसला सहस्ररश्मी स्वामी जगत्पती
प्रभा तयाची सहस्र योजन पसरे सोनेरी
प्रतिभा हाची सुयोग्य परिचय प्रतिभावंतासी ----- 5
----------------------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
विश्वावसू ,चैत्र शु. तृतीया (गौरीची तीज) 31मार्च ,
Comments
Post a Comment