INCHCAPE ROCK मृत्यूचा कातळ
INCHCAPE ROCK मृत्यूचा कातळ
माझी मैत्रिण विनयानी
मला एक सुंदर कॅलेंडर भेट म्हणून दिले. श्री. भास्कर सगर हया
अत्यंत निष्णात चित्रकाराने भारतातील विविध दीपस्तंभांची चित्रे त्यावर अत्यंत सुंदर
चितारली आहेत. खूप आवडली मला ती दिनदर्शिका. माझ्या कॉम्प्युटर टेबलवर विराजमानही झाली
लिहीताना सतत समुद्रात मार्गदर्शक ठरणारे ते दीपस्तंभ पहात असताना मला आपल्याला शाळेत असलेली
INCHCAPE ROCK कविता आठवत होती.
INCHCAPE ROCK हे Robert Southey ह्या1802 मधे प्रकाशित केलेले कथात्मक
गीत (Ballad) आहे.
स्कॉटलंडच्या पूर्व किनार्यापासून 18 कि.मि. वर समुद्राखाली वाळुचे
किंवा प्रवाळाचे खडक आहेत. INCHCAPE ROCK म्हणजे ज्याच्यावर मधमाशांच्या पोळ्यासारखी
षट्कोनी नक्षी आहे असे. असे खडक हे प्रवाळाचे
असतात. पाण्याखाली असलेले हे खडक न दिसल्यामुळे अनेक जहाजं ह्या प्रवाळ खडकांवर आपटून
फुटत. म्हणून तेथील अॅबरब्रॉथक हया मठाधीशाने
त्यावर एक सतत सूचना देत राहील अशी एक घंटा लावून ठेवली.
येथील सर राल्फ द रोव्हर नावाच्या एका समुद्र चाच्याने ती घंटा कापून
टाकली. पुढे काय झालं हे कवितेतून कळेलच! मनात कोरली गेलेली कविता मूळ कवितेहून थोडीफार बदल
दाखवत असेल. मराठीकरण करताना पात्रही आपली
करून घेतली.
अनाम
शांतता नभी, असीम सिंधु स्तब्ध हा
न
घालमेल सागरी, जळी भरेच सुस्तता ।। 1
दिशाहि
सुन्न सर्व ह्या, मनात काय त्यांचिया
कळे
कुणा न काहिही घुमेपणे उभ्याच का ।। 2
सवेग
चालले जहाज भेदुनी सलील हे
घमेंड
ती नसानसात सिंधुलाच जिंकले ।। 3
शिडात
दाटता हवा, गमेच छाति काढुनी
पुढेच
चालतो दबंग चक्रवर्ति तो कुणी ।। 4
निशाण
ते हवेवरी स्फुरे मिजास दाखवी
म्हणेच
डोलता पहा दिमाख सप्तसागरी ।। 5
करावया
मुशाफिरी सुसज्ज सागरावरी
जहाज
हेलकावते सुडौल ते जळावरी ।। 6
हवा
भरून ताणल्या धरे शिडांस ताणुनी
समर्थ
डोलकाठि ठाम निश्चला असे उभी ।। 7
--------------------
जळा-तळी
प्रवाळ रांग, शांत स्तब्ध सर्वदा
बसेचि
घात लावुनी जसाच पारधी वना ।। 8
दिसू
न दे सुडौल लाट ती प्रवाळ भित्तिका
जसा
फितूर दाखवी नसेचि गावचाच त्या ।। 9
असाच
दर्पकाळ तो, घडेचि सांज शर्वरी
जहाज
येत पाहुनी हसेच वीचि अंतरी ।। 10
हृदी
तुफान गूढसे वरून शांतता पुरी
असभ्य
एकजूट होय सभ्य वेश घेउनी ।। 11
सुसाट
ती सुटे हवा तुफान तांडवा करी
दगा
करे जशी धरून हात रम्य सुंदरी ।। 12
जळीच
हेलकावते जहाज मार्ग सोडुनी
सवेग
खेचलेचि जाय खोल भोवर्यामधी ।। 13
वहात
वादळासवे दिशा न सापडे तया
फिरे
इतस्ततःचि ते रया न राहिली जरा ।। 14
तुफान
दाखवी दिशा करेल दुर्दशाच जी
जहाज
आपटे सुसाट काळ कातळावरी ।। 15
कितीक
वार झेलुनी दमून जाय झुंजता
परास्त
भूप ये मुठीत क्रूर शत्रुच्या जसा ।। 16
समुद्र
पोत ते तसे गिळे प्रवाळ काळ हा
जळीच
एकसंध त्या दिसे न मागमूस वा ।। 17
लपे
जसाच कालिया करेच दंश घेरुनी
तशीच
हद्द कातळी कृतांत ती ठरे जळी ।। 18
उभे
जहाज आडवेच होउनी जळावरी
हळू
बुडे विसावण्यास खोल कातळावरी ।। 19
कितीक
पोटि घेत लाट ओठिचेच चाटुनी
न
मोजदाद सिंधुसीच घेतले किती बळी ।। 20
अपाप
तोय एकसंध होउनिच ते पुन्हा
तरंग
नील खेळवी जळावरी सुरम्य त्या ।। 21
----------------------
विनाश
हा पुन्हा पुन्हा बघे नरेश तेथला
उदास
होऊनी मनी करे विचार नेमका ।। 22
प्रवाळ
कातळावरी बसेल जो तरंगता
हलेल
जो जळासवे; तुटेल वादळात ना ।। 23
सुसज्ज
एक चौथरा असा जळात बांधला
तयावरीच
घंटिका करेचि नाद हालता ।। 24
कळेल
स्थान नेमके इथे प्रवाळ भिंत ही
दुरून
मार्ग घे दुजा जहाज ऐकुनी ध्वनी ।। 25
------
समुद्र
डाकु एक तो टपून राहि निर्दयी
असेच
त्या लुटारुच्या नियंत्रणात सिंधुही ।। 26
जहाज
येत पाहुनीच काळ-कातळाकडे
त्वरेच
झेप घेतसे सशस्त्र तो तया लुटे ।। 27
‘‘पिशाच
मी समुद्रिचे’’ म्हणेच दंड ठोकुनी
समुद्र
डाकु तो ‘अका’ ‘‘मलाच कोण थोपवी?’’ ।। 28
जराच
कानि ये ‘अका’ असेच नाम ज्या कुणा
भयेच
नेत्र फाकुनी अडेच कंठि श्वास त्या ।। 29
थरार
त्या मनी वसे चुकेच जो इथे जळी
म्हणेच
‘‘सर्व संपले मुकेन जीवनास मी’’ ।। 30
प्रवास
येथुनी करी खलाशि ते मनी भये
‘अका’चियाच
भीतिने स्मरेचि राम नाम ते ।। 31
परी
तिथेच लावता सुसज्ज घंटिका अशी
करेचि
सावधान जी चुकेच पोत ज्यास ती ।। 32
मनीच
कृद्ध त्यामुळे ‘अका’च जाहला अती
म्हणेच
क्षुद्र घंटिका मलाच थोपवी कशी? ।। 33
कसेच
सोडु सावजा हिच्यामुळेच हातचे
करेल
नाद ना उद्या धडा हिलाच देतसे ।। 34
-----------------------------
अतीव
सावधान तो पोचला जिथे असे
प्रवाळ
भिंत ती जळी जिथेच घंटिका असे ।। 35
कट्यार
चालवी अका कापलीच घंटिका
करून
नाद ती महा जळी बुडेच खोल त्या ।। 36
शिळाच
लोटता जळी उचंबळे वरी जसे
तसा
खळाळ नाद तो करून घंटिका बुडे ।। 37
खदा
खदा हसेच तो समुद्र डाकु निर्दयी
‘‘अकास
धाक दाखवी न जन्मला’’ म्हणे कुणी ।। 38
--------------------
मदांध
तो असा अका फिरेच सागरावरी
तयास
कोण रोखणार राज्य तो करे जळी ।। 39
परी
तुफान एकदा न सांगताचि पातले
अकास
देउनीच हूल भोवर्यात आणले ।। 40
जहाज
वादळासवेच जाय वाहुनी कुठे
दिशा
न कोठली कळे कुठे जहाज पोचले ।। 41
अका
बघेच घाबरून काय वाढले पुढे
बुडेच
भीतिसागरी समोर काय हे दिसे ।। 42
पिटून
ऊर ओढुनीच डोइचेचच केस ते
प्रवाळ
कातळावरी अका च पोचलो म्हणे ।। 43
भविष्य
पाहुनी तयास भूतकाळ आठवे
दिसेचि
घंटिका तया घणा घणा च वाजते ।। 44
घुसून
कातळी कट्यार, पोत ते दुभंगले
शिरेच
सिंधु वेगवान पोत व्यापले पुरे ।। 45
ध्वनी
प्रचंड जाहला परी जळी स्थिरावला
न
राहिले जहाज वा अका न राहिलाचि वा ।। 46
----------------------------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
चैत्र कृ. प्रतिपदा वैशाखी
14 एप्रिल 2025
Comments
Post a Comment