उनाड
उनाड
मन उनाड माझे भारी, तोडुनीच
दावे सुटले
मातीत शिंग खुपसाया, जणु
मस्तीत खोंड उधळे .....1
शिंगांवर सजली माती ,
गवताची लांबच पाती
जन हसते पाहून सारे, परि
मिरवे मम मन त्यासी .....2
तुटलेल्या दाव्याचे ते,
दोरखंड खंडित कंठी
नित फिरते त्याच्या संगे,
सांगते जातकुळ त्याची .....3
लोढणे बांधले कंठी, क्षिति
नाही ह्याची काही
मन मुक्त भटकते माझे, घरदार
न पर्वा त्यासी.....4
मन वारा पिऊनी धावे, जेथेच
पावला बंदी
मन करते ते ते सारे ,
हातांना ना जी संधी..... 5
ना नियम जगाचे ह्यासी, जे
करतिल हतबल पंगू
कोठलेच बंधन ह्यासी, होते
ना कधिही लागू.....6
चिंता न डोकवे काही, बेफिकीर
नजरेमधुनी
जे दिसेल त्या सामोरी , शक्तीने
भिडते त्यासी .....7
मन भटकत राही येथे, मन
भटकत राही तेथे
त्याच्यावर जोर न माझा, हे
अवगत त्यासी पुरते ..... 8
---------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
6 ऑक्टोबर 25 कोजागिरी पौर्णिमा
Comments
Post a Comment