दिव्यांची रांग
दिव्यांची रांग
उत्तर भारतातल्या कोहरा ह्या भयंकर प्रकाराची उग्रता आणि व्याप्ती कमी होत, आपल्याकडे त्याची पातळी धुक्यावर थांबते. महाराष्ट्रातही घाटात, जंगलात, कोकणात, पहाटेच्या प्रवासात धुक्यात हरवलेले रस्ते मनाला छान वाटत असले तरी, गाडी चालवताना रस्त्याची जाणीवही पुसून टाकतात. डोळे असून अंधळे करून टाकतात. नेहमी खाली डोकावताना धडकी भरवणार्या दर्यांचे खड्डे बुजवून, माना वर करून बघायला लावणार्या उंचच उंच डोंगररांगांना बुडवून, ‘मी किती हिरवागार सुंदर’ म्हणणार्या उंच वृक्षराजीला पुसून टाकून, सूर्यालाही मुठीत बंद करून सगळ्या सृष्टीच्या अहंकाराला लिंपून घेणारं हे धुकं सर्वांना असून नसल्यासारखं करून टाकतं. ह्या दाट धुक्यात झेंडा घेऊन सैन्याच्या अग्रभागी चालणार्या बिन्नीच्या घोडेस्वारासारखी मिणमिणती दिव्यांची रांग सर्वाना रस्त्याचा अंदाज देत राहते.
दिव्यांची
रांग
धुक्यात
हरवली वाट शोधते दूर दिव्यांची रांग
तटस्थतेने
उभे पथावर दिनरात दिव्याचे खांब
धुके
लोळते रस्त्यावरती, जणू घेउनिया भांग
अलगद
पडते भूवर त्याचे जडावलेच प्रत्येकांग
असीम
महौदधीच्या येती लाटांवरती लाटा
आकाशातुन
उतरत खाली कवेत घेती वाटा
धुक्यात
गेली बुडून झाडे धुक्यात बुडले रस्ते
कृती
आकृती विरल्या त्यांचे अहं धुक्यातचि शमले
दर्या
कंदरे बुजवी, धुके हे बुडवी पर्वतरांग
लिंपुन
घेई कुशलपणाने सर्वांचाच अभिमान
परि
मिचमिचणारी त्यात दिसे, ती दूर दिव्यांची रांग
अविचल
जणु का तपस्विनीसम पथदर्शक बिन्नीस्वार
----------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
फाल्गुन
अमलकी शु. एकादशी, 10 मार्च2025
Comments
Post a Comment