कोयना-

 

कोना



सुडौल ही तरंगिणी सुरम्य कोयना पहा

घडा भरून गच्च जाय नार भासते अहा!

बटा हवेवरी जशा भुरू भरू तरंगती

तरंग हे जळावरी तसे सुरम्य वाहती ----- 1

 

वळे प्रवाह नागमोड संगतीस तीर ही

जशाच नर्तिका कुणी एकसाथ नाचती

प्रगाढ सख्य ये दिसून नीर तीर ह्या मधे

करांस गुंफुनी जशा सख्याच चालल्या दिसे ----- 2

 

न उच्च नीच भेद हा दिसेच पातळीमधे

प्रवाह आणि काठ हे समान पातळीमधे

मधेच रूपवान नीलनीरवस्त्र कोयना

पाचुची किनार दोही बाजुला मनोरमा ----- 3

 

 

शकुंतलेस धाडण्या पतिगृही जशा तिच्या

करी प्रवास दूरचा सख्या तिच्यासवे जशा

परस्परांचिया गळ्यात घालुनी गळे सुखे

करांस ठेउनीच स्कंदि एकमेकिच्या सवे ----- 4

 

सुकेशिनी निघे तशीच कोयना पतीकडे

सुहासिनी सुदर्शना तिच्याच ह्या सख्यांसवे

तिच्यावरी धरेच छत्र नील अंतराळ हे

द्रुमावली बघे स्वतःस निर्मला जलामधे ----- 5

 

निमग्न नर्तनी सख्या; प्रवासही न थांबता

कितीक काळ थांबुनी पहात राहले मुदा

विलोभनीय रूप ते ठसे मनात माझिया

अजून नेत्र चित्त हे करीच चिंतना तिच्या ----- 6

-------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

5 मे 2025

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

कवठ -

कुंद