पहिली कविता
पहिली कविता
जुलमी सत्ताधीश आतपी,
लुटून नेई अवघी अवनी
अश्रू सुकुनी गालावरती
कोमेजुन मुखमंडल जाई --- ।। 1
मरुद्गणांची साथ रवीसी
लुटण्या वैभव धनसम्पत्ती
धुळीत माखुन गेली अवघी
वसुंधरा ती अती लाघवी --- ।। 2
निराधार त्या वसुंधरेसी
उरे न त्राता जगती कोणी
कढ दुःखाचे गिळता गिळता
हृदय विदीर्ण शतखंडच होई --- ।। 3
आक्रमणाने पीडित वंचित
अबोल झाली; खिन्न तिचे मन
धरणी टाकी उष्ण उसासे
सर्पिण जखमी जशी फुसफुसे --- ।। 4
विष भरल्या त्या उच्छ्वासांनी
मरणाचे थैमान भोवती
दुःखी होती मुले माणसे,
पशू पक्षि द्रुम-लताचि खासे
अभाग्यास ना पुसे कुणीही
त्यजति जळत्या तरुसी द्विजही
दारिद्र्याचा येता फेरा
चुकविति त्याला जिवलग साथी
अवचित येई झुळुक सानुली
घाली फुंकर जखमेवरती
‘‘मरणानंतर दुजे मरण ना’’
देई विश्वासाने ग्वाही --- ।। 7
‘‘उरे न काही जेव्हा लुटण्या
भय लुटण्याचे कशास चित्ता
गळून पडता कात, नव्याने
पुनर्जन्म तो, ये अनुभवता
एक असे जरि क्षण मरणाचा
अखंड चालू जीवन यात्रा
नित्य वाहते जीवन सरिता
चैतन्यचि दे ओळख हृदया’’ --- ।। 9
हीच असे का कविता पहिली!
गेली सांगुन झुळुक सानुली
का आद्य कवीला प्रतिभा स्फुरली
रहस्य सनातन उकलुन गेली ---!!! ।। 10
--------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
फाल्गुन कृ. षष्ठी (नाथषष्ठी) 20 मार्च 2025

.jpg)
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment