छोटा भाऊ -

 

छोटा भाऊ -

 

लहानपणी हवा होता 

एक भाऊ लहानसा

बोक्यासारखा असेल जो

भारीच सोसमावसा

 

कडेवर बसायला सोकावलेला

ऐटित माऊसारखा

पाय घासले जमिनीवर तरी

उतरणार नाही असा

 

लळतलोंबत घेऊन जाईन

त्याला वाट्टेल तसा

गोळी देताच गट्टम करेल

हट्ट करेल खासा

 

हट्ट धरेल तुझ्या सोबत

मी पण येईन असा

भोकाड पसरेल बसकण मारून

मी शाळेत जाता

 

चुकवून त्याला जाता मी

कधी सिनेमाला

घालेल धपके येताच मी

अन् घालेल मिठी मला

 

फिक्कुटलेल्या आठवणीत

 एक भाऊ असा

 


मोठ्यांच्या भाऊगर्दीत

भेटलाच नाही मला

 

 

काळ गेला उडून

आणि पिढी गेली पुसून

एकदा आला त्याचा फोन

सातासमुद्रापलिकडून

 

होतो तुझा लहान भाऊ

आठवतो का गं तुला?

सापडला आज पत्ता तुझा

अन् आनंद झाला मला’’

 

इथूनच करतो नमस्कार तुला

घे मानून खरा

क्षणात झाले त्याची ताई

मी आढेवेढे  घेतां

 

जरी टेकले साठीला

तरी राहिलेच होते छोटी

आनंदाने घालत शीळ

म्हटले, आज झाले मोठी

 

भेटलोच नाही जरी आम्ही

तरी भाऊ छोटा भेटला 

मोठी ताई व्हायची हौस

आज ओवाळणीत मिळाली मला

 

--------------------------------------------

लेखणी  अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

वादळ 1

कडुनिंब 2