तुलसीविवाह
तुलसीविवाह
दसरा सरला आत्ता म्हणता म्हणता दिवाळी येते.---- की आलच तुळशीचं
लग्न! मंजिर्यांनी डवरलेली अवखळ कृष्णतुळस
त्या उगवत्या नारायणासोबत मनमुक्त हसत आणि ‘‘डुले मंजिरी मंजिरी प्राजक्ताच्या पायापाशी’’
म्हणत तारुण्यात पदार्पण करते.
तरुण तुलसी मालांनी मनातच भगवंत नटतो. ``तरुण तुलसीमाला’’
म्हणजे फुलावर आलेली तुळस! ती उपवर झाल्याचं की हो लक्षण!
तुळशीविवाहाचा सोहळा तर निसर्गानेच ठरवलाय. निमंत्रणाच्या
अक्षता घेउन कितीजण उभे आहेत.
तुलसीविवाह
मात्रा - 8:8:8:6
श्रीरंगाचा तुळशीसंगे । विवाह निश्चित
झाला हो
कार्तिक मासी शुद्ध द्वादशी । मुहूर्त
गोरज ठरला हो
सुबक ठेंगणी तुळस साजिरी । शालु नेसली
अंजीरी
निळा जांभळा पदरचि त्याचा । कशिदा त्यावर मंजीरी
तरु-पोशाखा-मधेचि यावे । नातलगांनी सार्या
हो
वर्हाडास सार्याच कळविले । बेत ठरविला
पक्का हो
बहिण सुभद्रा बनुनी कांचन । आकर्षक ती
सजली हो
निळ्या जांभळ्या लाल फुलांची । नेसुन साडी
हसली हो
तुळशी मागे उभा राहिला । पुंड्या ऊसचि मामा
हो
गोड काम हे मला करू दे । धरुनी आग्रह ऐसा
हो
वर्हाडातल्या मान्यवरांचे । स्वागत
करण्या नटुनी हो
उभा गगनचाफा बनुनीया । बलरामचि तो ऐटित हो
चार पाकळ्यांच्या घंटांचे । नाजुक नाजुक
लेवुन हो
अलंकार ते अंगावरती । शोभुन दिसती धवलचि
हो
सजवितोच रांगोळ्या सुंदर । होति उपस्थित
मुग्धचि हो
किती झुंबरे नाजुक नाजुक । वार्यावरती झुलती हो
कुणी जाहले शेवंती तर । मरवा चाफा कोणी हो
कुणी जाहले रातऽराणी । बोगनवेली कुंदचि हो
मोरपिशी रेशीमवस्त्र हे । नीलअंबराचे बहुमोल
नेसुन हरि हा दिसे देखणा । खिळले डोळे त्यावर हो
तरूण तुलसी मालांचे हे । बाहु घालुनी हरिकंठी
तुळस लाजुनी गोरीमोरी । हरि वक्षावर मुख लपवी
क्रोधे झाल्या भामा रुक्मिणि । पारिजात मोगरीच हो
झाडुन सारी फुले नि पाने । रुसून अंगणि बसल्या हो
सौख्याचा हा असे सोहळा । नवरा नवरीकडुनी हो
वर्हाडास आहेर मिळे तो । सुखसमृद्धी यांचा हो
------------------------------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment