सप्तपर्णी
सप्तपर्णी
गगनचाफा / बूच बहरत असताना त्याचा सुगंध दरवळत
असताना अजून काही दिवसात जरा थंडीची चाहूल लागायला लागते. मधेच एखादी थंड झुळुक पहाटे
वा सूर्य मावळल्यावर अंगावर जरा काटा आणते आणि त्याचवेळेस वार्यासोबत आलेला कुठलासा
थंड उग्र वास एक जोरदार शिंक यायला कारणीभूत ठरतो.
काही झाडं जात्याच दडस असतात. खोडकिडा, पोरकिडा,
बोंडआळी, उंटआळी, करपा, तांबेरा असे कुठलेही रोग त्यांच्या वाट्यास जात नाहीत. ही झाडं
मात्र त्यांच्या आगाऊपणामुळे दुसर्या कुठच्या झाडाला आपल्या वार्याला उभं करत नाहीत.
सहाजिकच ही झाडं भारतीय असण्यापेक्षा परदेशी असण्याचा कल जास्त दिसून येतो. शतकं संपली
पण ऑस्ट्रेलियातून आलेलं काँग्रेस गवत असो, वा निलगिरी, सुबाभुळ, ग्लिरीसिडिया/उंदिरमारी
वा इतर तत्सम झाडं असोत. वा चिनी बनाटीचं/ ओरिजिनचं सप्तपर्णी वा ब्लॅकबोर्ड ट्री असो.
नाही म्हणायला पश्चिम बंगालनी म्हणे त्याला आपल्या प्रांताचा वृक्ष म्हणून सन्मानित
केलं आहे.
परदेशी लोकांनी ज्याप्रमाणे भारतीयांवर अनन्वित
अत्याचार करून त्यांना मारले त्याप्रमाणे ही झाडंही आपल्या भारतीय झाडांना नामशेष करत आहेत. ही झाडं
वाढतांना मातीतील सर्व पोषकतत्त्वे भसाभसा घेऊन भली भक्कम वाढतात. सप्तपर्णीचा उल्लेख
सैतानाचं झाड असाही केलेला आढळतो तरी हे झाड वनविभाग वा सर्व महापालिकांचं फार लाडकं
झाड आहे.
सप्तपर्णी
(वृत्त – भुजंगप्रयात)
जरा ओसरे ती हवा पावसाळी
जरा वाहु लागेच वारा हिवाळी
अशा दो ऋतुंच्या सदा संधिकाळी
फुले सप्तपर्णी पहा सांजवेळी ।।
उठे वृक्ष निद्रिस्त जैसा उठावा
शरीरामधूनीच सैतान तैसा
लपेटून घेई तनू ती स्वतःची
हर्या-गाभुळ्या पुष्पगुच्छांमधे ती ।।
पराकोटिचा तो सुटे गंध त्याचा
नको होतसे उग्र तो दर्प नाका
सुरू होय डोकेदुखी ती अवेळी
उमासेच येती जना सांजवेळी ।।
बहू शिंकुनी लोक हैराण होती
तरी गल्लि दिल्लीत सर्वत्र जाणी
असो पालिका वा वनोद्यान खाते
विभागांस सार्या रुचे सप्तपर्णी ।।
विषारी असे चीक त्याचा म्हणोनी
न लागे किडा, खात ना त्यास प्राणी
जरी काळजी घेतली ना तयाची
तरी पाय रोवून खंबीर राही ।।
नसे खर्च खात्यांस त्याचा जराही
न कापे तरूला कुणी इंधनासी
म्हणोनी पथांना सदा भूषवी हा
चिनीवृक्ष दीर्घायुषी सप्तपर्णी ।।
---------------------------------
#लेखणीअरुंधतीची-
Comments
Post a Comment