प्रियांगी / प्रियमोहर / (Tabebuia rosea)

 

प्रियांगी / प्रियमोहर / (Tabebuia rosea)



हल्ली प्रत्येक कार्यक्रमाला संकल्पना असते. Theme असते. तशी पौष - माघ म्हणजे जाने-15 ते फेब्रु -15 ह्या महिन्यात निसर्गाने गुलाबी रंग आपल्या Theme मधे घोषित केला असावा. सध्या रस्तोरस्ती देशी गुलाबाच्या रंगाचा टाबुबीया (Tabebuia rosea) फुलला आहे. रोज वाहनांच्या प्रदूषणाने धूळभरल्या थंडीत काड्यामोड्या झालेल्या,  गर्दीत लपलेल्या, ह्या निनावी वाटणार्‍या झाडांनी जानेवारीच्या मध्यापासूनच स्वतःचे रंग दाखवायला सुरवात केली आहे. नको ते नाही तर, सुंदर आकर्षक गुलाबी! गावठी गुलाबाचा गुलाबी! मनाला सुखावणारा त्याचा गुलाबी रंग पाहून निसर्ग निष्पर्ण कडाक्याची थंडी संपल्याचं घोषित करून गुलाबी थंडीची सुंदर वातावरण निर्मिती (Ambiance) करतोय असं वाटलं. आजूबाजूचा परिसर मनाला गोड वाटेल असा करतोय.

गुलाबी फुलांनी बहरलेल्या, नाजुक देखण्या तरुणी प्रमाणे दिसणार्‍या ह्या तरुवराचं त्याच्या नावाशी काही विसंगत नातं आहे असं वाटलं. खर तर आपण कानांनी पहात असतो. डोळ्यांनी ऐकत असतो. स्पर्शाने बोलत असतो. बोलण्यातून स्पर्शतो.  नाकाने ठरवतो; आणि बुद्धीने हुंगतो असं मला वाटतं. त्यामुळे कानांनी पाहिलेलं टाबुबिया हे झाड टरबूजाकडे झुकणारं बेढब वाटलं मला.  डोळ्यांनी ऐकतांना, त्याचा रंग आणि नाजुकपणा पाहून ह्या झाडाचं नाव प्रिया, प्रियांगी किंवा प्रियमोहर ठेवलं मी. बघा तुम्हाला आवडतय का? 

माहित नाही पण कुठल्याशा पक्ष्यांनी त्याच्यावर फार कलाकुसर नसलेली काड्याकाड्यांची घरटीही बांधलीएत. कावळ्याचीही असू शकतील. पक्ष्यांनी झाडावर घरटं बांधलं की, भले तो वृक्ष व्हेनेझुएला, दक्षिण मेक्सिको, इक्वॅडॉर अशा बाहेरच्या देशातला जरी असला तरी निसर्गानी स्वीकारला असं वाटतं. आपल्या देशातला झाला असं वाटतं. ‘‘मी तुझी पिल्लं सांभाळीन तू मला जगण्यापुरतं पाणी देत जा.’’ अशा रोटी बेटी व्यवहाराला योग्य ठरतो.

 



वसुंधरेच्या रंगभूमिवर, प्रवेशिता हा शिशिर ।

हेमंताचा अभिनय संपुन , जाई तो बाहेर ।।

कलासादरीकरण होतसे , शिशिराचे नेमस्त ।

हळुवार जागवी चैतन्यासी, निसर्गास निद्रिस्त।।

 प्राणभयाने आक्रसलेले , तरुवर घेती श्वास ।

पर्णहीन फांद्यांना सजवी, । पल्लव ते घनदाट ।।

पर्णकळ्या वा कळ्या मनोहर , मोहुन घेती चित्त ।

शिशिराच्या स्पर्शाने उठती , निद्रिस्त प्रियांगी वृक्ष ।।

गुलदस्ते हे सजवित जाई, रोज फुलांचे कोण ।

काल उभ्या निष्पर्ण तरुवरी, रंग गुलाबी गोड ।।

आज एक तर उद्या दुजावर, उमटे कोमल रंग ।

आस्ते आस्ते उषा सजविते, रांग तरुंची रम्य ।।

अदृश्यातुन प्रकट होति हे, पुष्पगुच्छ रमणीय ।

बघता बघता शाखा शाखा , वेधून घेति लक्ष ।।

नजर ठरत ना, मोहक तरुवर, ही कोण अप्सरा कोण ।

तरुवर जपती गोड गुलाबी , रम्य उषेचे स्वप्न ।।

 


अरुंधतीप्रवीणदीक्षित-

7 फेब्रु. 2026

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

वादळ 1

sip your Coffee-