Posts

Showing posts from March, 2025

पहिली कविता

Image
  प हि ली क वि ता जुलमी सत्ताधीश आतपी, लुटून नेई अवघी अवनी अश्रू सुकुनी गालावरती कोमेजुन मुखमंडल जाई --- ।। 1 ( आतपी – सूर्य, अवनी- पृथ्वी )   मरुद्गणांची साथ रवीसी लुटण्या वैभव धनसम्पत्ती धुळीत माखुन गेली अवघी वसुंधरा ती अती लाघवी --- ।। 2     निराधार त्या वसुंधरेसी उरे न त्राता जगती कोणी कढ दुःखाचे गिळता गिळता हृदय विदीर्ण शतखंडच होई --- ।। 3   आक्रमणाने पीडित वंचित अबोल झाली; खिन्न तिचे मन धरणी टाकी उष्ण उसासे सर्पिण जखमी जशी फुसफुसे --- ।। 4 विष भरल्या त्या उच्छ्वासांनी मरणाचे थैमान भोवती दुःखी होती मुले माणसे, पशू पक्षि द्रुम-लताचि खासे  --- ।। 5   अभाग्यास ना पुसे कुणीही त्यजति   जळत्या तरुसी   द्विजही दारिद्र्याचा येता फेरा चुकविति त्याला जिवलग साथी  --- ।। 6   अवचित येई झुळुक सानुली घाली  फुंकर  जखमेवरती  ‘‘मरणानंतर दुजे मरण ना’’ देई विश्वासाने ग्वाही --- ।। 7   ‘‘उरे न काही जेव्हा लुटण्या भय लुटण्याचे कशास चित्ता गळून पडता ...

दिव्यांची रांग

Image
  दिव्यांची रांग उत्तर भारतातल्या कोहरा ह्या भयंकर प्रकाराची उग्रता आणि व्याप्ती कमी होत, आपल्याकडे त्याची पातळी धुक्यावर थांबते. महाराष्ट्रातही घाटात, जंगलात, कोकणात, पहाटेच्या प्रवासात धुक्यात हरवलेले रस्ते मनाला छान वाटत असले तरी, गाडी चालवताना रस्त्याची जाणीवही पुसून टाकतात. डोळे असून अंधळे करून टाकतात. नेहमी खाली डोकावताना धडकी भरवणार्‍या दर्‍यांचे खड्डे बुजवून, माना वर करून बघायला लावणार्‍या उंचच उंच डोंगररांगांना बुडवून, ‘मी किती हिरवागार सुंदर’ म्हणणार्‍या उंच वृक्षराजीला पुसून टाकून, सूर्यालाही मुठीत बंद करून सगळ्या सृष्टीच्या अहंकाराला लिंपून घेणारं हे धुकं सर्वांना असून नसल्यासारखं करून टाकतं. ह्या दाट धुक्यात झेंडा घेऊन सैन्याच्या अग्रभागी चालणार्‍या बिन्नीच्या घोडेस्वारासारखी मिणमिणती दिव्यांची रांग सर्वाना  रस्त्याचा  अंदाज देत राहते. दिव्यांची रांग धुक्यात हरवली वाट शोधते दूर दिव्यांची रांग तटस्थतेने उभे पथावर दिनरात दिव्याचे खांब धुके लोळते रस्त्यावरती, जणू घेउनिया भांग अलगद पडते भूवर त्याचे जडावलेच प्रत्येकांग असीम महौदधीच्या येती लाटांवरती ला...

मायबोली-

Image
  मायबोली- तुझी तर्जनी माय आधार माझा तुझ्या संगती चालतो मार्ग सारा नसे माहिती तू मला घेऊनी गे कुठे चालली गाव तो कोणता गे   परी मागुती मी तुझ्या चालताना न शंका न भ्रांती न भीती मनाला गमे स्वर्ग माझ्याच आहे मुठीते कशाची कमी वाटते ना मनाते   किती शब्दलेणी मला घालुनीया सुशोभीत केले तुझ्या ह्या मुलाला कळावी कशी माउलीचीच माया करे माय ते गोड वाटे तयाला   अगे बोलतो बोबडे बोल मी जे जसे बोलवी तूच तैसे मुखाने कसा मीच निर्भीड गर्दीतही गे तुझा हात हाती धरोनीच चाले   परी माय गर्दीत सोडू नको गे तुझ्यावीण बोलू शके मी कसा गे जरी हात गेला सुटोनी कधीही पुन्हा लेकरा माय कैसी मिळावी   अगे माय माझी मराठी सुवर्णी अडे शब्द माझा तुझ्यावीण कंठी असे हात हाती तुझा जोवरी गे दिमाखात मी तोवरी बोलतो गे --------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित- 27 फेब्रु. 2025