मायबोली-

 

मायबोली-



तुझी तर्जनी माय आधार माझा

तुझ्या संगती चालतो मार्ग सारा

नसे माहिती तू मला घेऊनी गे

कुठे चालली गाव तो कोणता गे

 

परी मागुती मी तुझ्या चालताना

न शंका न भ्रांती न भीती मनाला

गमे स्वर्ग माझ्याच आहे मुठीते

कशाची कमी वाटते ना मनाते

 

किती शब्दलेणी मला घालुनीया

सुशोभीत केले तुझ्या ह्या मुलाला

कळावी कशी माउलीचीच माया

करे माय ते गोड वाटे तयाला

 

अगे बोलतो बोबडे बोल मी जे

जसे बोलवी तूच तैसे मुखाने

कसा मीच निर्भीड गर्दीतही गे

तुझा हात हाती धरोनीच चाले

 

परी माय गर्दीत सोडू नको गे

तुझ्यावीण बोलू शके मी कसा गे

जरी हात गेला सुटोनी कधीही

पुन्हा लेकरा माय कैसी मिळावी

 

अगे माय माझी मराठी सुवर्णी

अडे शब्द माझा तुझ्यावीण कंठी

असे हात हाती तुझा जोवरी गे

दिमाखात मी तोवरी बोलतो गे

---------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

27 फेब्रु. 2025


Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

कवठ -

कुंद