Posts

Showing posts from February, 2025

उद्दिष्ट

  उ द्दि ष्ट प्रवाहासवे वाहती काटक्या ह्या कुणी ह्या तरूच्या; कुणी त्या तरूच्या कुणी वाळलेल्या, कुणी मोडलेल्या गळाल्याच ज्या भार वृक्षास झाल्या ----- 1   तरू सोडता व्यर्थ झाले जिणे ते असो येथ वा तेथ बेवारसाचे जळाची दिशा, वेग वा भोवर्‍यांनी कधी वाहती वा किनार्‍यास येती ----- 2   न राहे तयांसीच उद्दिष्ट काही न अस्तित्त्व त्यांचे कुणा मान्य होई मतीला असे पायबंदी जळाची प्रवाही पडे त्या गती ना स्वतःची ----- 3   परी पाणपक्षीच चोचीमधूनी तयांसीच एकेक गोळा करूनी निवारा करी पाणवेलींवरी त्या जळी भासती बेटुली पाचुची ज्या ----- 4   तरंगे तरंगांवरी तो निवारा सदा ओंजळी घेऊनी पक्षिबाळा तयांच्याच छोट्या पदाने सुखावे पसाराच तो वाळल्या काटक्यांचा ----- 5   कशा पाणवेली, कुठे काटक्या त्या तिरस्कार ज्यांचा जगानेच केला नवा अर्थ त्यांच्या मिळे जीवनासी घडे देखणी काटक्यांची हवेली ----- 6 ------------------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित माघ कृ. चतुर्थी 16 फेब्रु.2025

महाकुम्भ

  महा कुम्भ मनात माझिया वसे, वसंत हा सदाकदा   जाहलेचि खोड जरठ, मोहरले हृदय सदा -----1   मुळांस वाळवी जरी, सुवर्णपालवी वरी मनात रत्नमाणकां, फुटेच कोवळी कळी-----2   जरी दिशा ओस ओस, पुष्पांचे डुलति घोस शर्वरी करे हताश, फुले मनी तरि प्रकाश -----3   मनी बहर उन्मादक, क्षण क्षण हो आह्लादक जीर्णशीर्ण देहकवच, हृदि झिरपे संजीवन -----4   जनन-मरण देहप्रथा , मना नसे जरा व्यथा न जुमाने मन देहा , वेगळीच असे कथा -----5   संतमत कुंभातुनी, थेंब एक निसटलाच त्यातुन कणिकाच एक, स्पर्शली मम मनास -----6   महाकुंभ स्नान हेच , अमृतमय होय हृदय संतसुमन परिमळ मी,  व्यापे हे अंतरिक्ष -----7 -------------------------------------------- अरुंधतीप्रवीणदीक्षित- माघ पौर्णिमा ( 12 फेब्रु. 2025)

भारंड

Image
  भारंड- नृत्य शिकणार्‍या मुलीने मला भ र तनाट्यम नृत्यातील "रुंडभारुंड"ची हस्तमुद्रा करून दाखली. आणि मला त्या काल्पनिक पक्ष्याचा फोटोही दाखवला. मला पंचतंत्रातील गोष्ट माहित होती. दोघींना  नवीन माहिती मिळाली. पक्षी   होता   एक   तयाचे   ।   नाव   म्हणे भा रं ड दोन पाय अन दोन पंख त्या । एकचि होते पोट होती त्यासी दोन शिरे अन । होत्या माना दोन दोन दिशांना तोंडे त्याची। करिती नित्य भांडण     सागरतीरी हिंडत होता । भक्ष्याच्या शोधात लाटांवरुनी तोच तरंगत । कुठलेसे आले फळ एक चोच ती पकडे फळ ते । रसाळ अन् आकर्षक पहिले मुख ते खाता वदले । स्वादिष्ट जणु अमृत   खा इन   अर्धे   देइन  अर्धे   ।   माझ्या   मीच   प्रियेस दुजे तोंड ते वदे तयासी । मजला ही दे घास रसाळ   फळ   ते   कणभर   मिळता   ।    शमेल   जिह्वालौल्य सुखदुःखे   ही   एक   आपुली   । तृप्ती अपुली एक   परि दुर्लक्षुन दुजास तोची । वागे तसा खुशाल फळ अर्धे ते खाऊन त्याने । दिले प...