घार

 

घा

 

                          नेहमी जमिनीवर उभं राहून घारीची भरारी पहातांना मान अभिमानाने ऊंच होते एखाद्या ऊंच टोकावर तिचं बसणं मला कायम सिंहासनावर बसल्यासारखं भारदस्त वाटत. आकाशात पंख पसरून ग्लायडर सारखं तिचं फिरणं कितीही वेळ पहात बसलं तरी मला तेवढच अद्भुत वाटतं.

                          मुंबईच्या टॉवरमधून दिसणारं सगळं जग वेगळच असतं. मुंबईच्या टॉवरवरून पहातांना मला ती इतक्या जवळून दिसली की त्याचं अप्रूप संपत नव्हतं. तिचा करडा रंग जवळून पाहतांना जास्तच चमकदार आणि मऊशार दिसत होता. रामाने खारीच्या पाठीवर फिरवलेल्या बोटांसारखी पण जरा वेगळीच - - लाटा लाटांसारखी नक्षी तिच्या पाठीवर उमटलेली पाहून मीही माझ्या नजरेनीच तिच्या अंगावरून हळुवार हात फिरवून आले. नेहमी पोटाकडून (ventral side ) दिसणार्‍या घारीची नजरेलाही जाणवणारी मऊशार पिसांची पाठीची बाजू (dorsal side) मोठी मोहक होती. तिचा रुबाब, बसण्याची ऐट , बाकदार चोच, कणखर पंजे  इतक्या जवळून बघत असतांनाच अचानक तिने तिचे ताकदवान भरदार पंख पसरले चिर्रर्रऽऽऽऽ मैलभर लांब जाईल अशी हाळी घालीत बसल्या कठड्याला मागे लोटीत दमदार भरारी घेतली. ऊंच उडणारी घार वरतून पहातांना माझी मान खाली झुकली, ------

उंच उंच आकाशात

स्थिर होती एक घार

पंख पसरुन अलिशान

आकाशावर झाली स्वार

 

हवेच्या ती झोतावर

संथ वळे वार्‍यावर

अलगद जाई वरवर

गगन तोलले पंखांवर

 

दमदार भरारी भेदक नजर

सावज हेरुन देई खबर

भुगा करेल दगडाचाही

अशी तिची चोच कणखर

 

पंजांची ती ताकद जबर

ठरत नव्हती त्यावर नजर

वाव नव्हताच सुटकेलाही

पकडीतून तिच्या तिळभर

 

 

खाली रोखली तिची नजर

अचूक टिपे भक्ष्याची खबर

झडप घातली शिकारीवर

चिर्रऽऽऽ चिऽऽ चि तिची विजयी नजर

 

भक्ष्य भक्ष्यकाचा खेळ भयंकर

पाहिला नव्हता कधी आजवर

विस्फारून मी डोळे माझे

बघत होते रोखून नजर

 

मनी म्हणाले श्वास रोधून

`यम गेला कोणावर धावून'

अरेरे--

 

 

एक खोल उसासा सोडून

हाय! म्हणाले तिला पाहून

 

एक काळी पिशवि कचर्‍याची

मेल्या कोंबडीच्या पिसांची

चिवडीत होती ती घार

चोच तिची अणकुचीदार

 

मनात माझ्या एकच विचार

छळत राहिला फार फार

म्हणत होते घार घार

निघून गेली त्याची धार

 

पंख तिचे भरदार

भरारी तिची दमदार

तीक्ष्ण नजरेतत असा थरार

उघडले वाटे मृत्युचे दार

 

पंजाची ती पकड कसदार यमाला वाटे घ्यावी उधार

चोच तिची धारदार

माणसापुढे का झाली लाचार?  

 

-----------------------------------------------

 

 

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते