दीपमाळ

 

दीपमाळ


अहो जाहला देह हा दीपमाळ

उभा राउळाच्या पुढे सर्वकाळ

जना दावितो वाट ही राउळाची

सदा भक्तितेजात तेजाळलेली ।। 1

 

पहा तेवती लक्ष ह्या सांजवाती

प्रभेनेच ओथंबल्या दाट राती

बघे हा दुरूनी मला भक्तवृन्द

भरूनीच येई तयांचेच चित्त  ।। 2

 

पटे राउळाची मनी खूणगाठ

तयांचेच ओलावती नेत्रकाठ

किती पाय भेगाळले चालुनी हे

तरी चालणे सार्थकी लागले हे  ।। 3

 

अबीरा-समा वाटते आज धूळ

बघोनी म्हणे भक्त ही दीपमाळ

करांनी जुळावे अपोआप आज

असा श्रीहरी दर्शनाचा सुयोग  ।। 4

 

असे बोल येता श्रुती होति धन्य

सुखावून होई मनी मीच तृप्त

अहो माखता पायधूलीत अंग

मला लाभतो नित्य श्रीरंगसंग  ।। 5

 

जरी पाहिले ना तुझ्या श्रीमुखासी

भरूनीच डोळे प्रभो एकदाही

सदा सर्वदा हे उभे राहणेही

मला मान्य रे राउळीच्या समोरी  ।। 6

 

-----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते