पळस
पळस
कधीकाळी पुणे मुंबई रेल्वे
प्रवासात आपल्या कणखर देशा, दगडांच्या देशातील पुणे उपनगर आणि ग्रामीण मधली वाकडेवाडी, खडकी, बोपोडी,
दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, देहूरोड, बेगडेवाडी, घोरवाडी,
ही खडखडीत गावं मागे टाकत गाडी तळेगाव कामशेत ला पोचली की, आंबेमोहराचा सुगंध घेण्यासाठीच जरा मोकळा श्वास घेत
असे. ऋतुमानाप्रमाणे हिरवी गार डोलणारी भाताची
शेती किंवा कापणी, मळणी चाललेला भात, जवळच असलेल्या भात सडीच्या गिरण्या वा रपरप पावसात
चाललेली भाताची लागवड सर्वाची अनुभूती घेत गाडी घाटमाथा चढू लागली की माथ्यावर छत्र
धरणारे ढग, हवेतला ओला गारवा डोंगरावरची वनराईची शोभा बघत लोणावळा, खंडाळा, मंकी हिल,
ठाकूरवाडी, जवळे, घााटमाथा परिसर मागे टाकत कर्जत, पळसदरी, केळवली, वांगणी, शेळू, नेरळ,
भिवपुरी रोड, अशा सुंदर भागातून वनराणीसारखी जात असे. आपला नेहमीचा ठराविक थांब्यांना
थांबूनही शिवाय वरील कुठल्याही स्टेशनवर थांबली तरी नेत्रसुख असे. जोडीला थंडगार वायु
लहरींच्या चौर्या ढाळणे सुरू होई. घाट रस्त्याने जातांना ट्रेनचा
वेगही मंदावे. गाडी केळावली ला ड़ेग कमी करू लागली की
रानकेळांनी डोंगराच्या कडेकपारींवर टाकलेला हिरवागार मुक्काम डोळ्यात भरे. ह्या
जंगली केळांना आम्ही चवीणीची झाडं म्हणत असू. त्यांचा बुंधा उंचीला एकदम खुजा असे.
पानं मात्र केळीसारखी लांबसडक मोठ्ठाल्ली. नेहमीच्या केळीची पान वार्याने टरटरा
फाटतात असं सांगणार्या बहिणाबाईंना ही केळ ताठ मानेनी सांगे, ‘‘ बहिणे! अगं, आम्ही रानकेळी ! नाजुक साजुक फाटणार्या न्हाय.
कितीही वादळवारं आणि पावसानं झोडपलं तरी फाटनार न्हाय, वाकणार न्हाय कारण आम्ही
निसर्गासोबत जमवून घेतलाय.’’ केळांचे लोंगर लटकतांना दिसत. पण ते कोणी काढायची
धडपड करतांना दिसत नसत. तेथील करवंदांच्या जाळीतून विकायला आलेली पानाच्या
द्रोणातील ताजी करवंद अर्धी उष्टावून आम्ही कोंबडा का कोंबडी ते पहात असू. म्हणजे
करवंद लाल निघालं की कोंबडा आणि पांढरं निघालं की कोंबडी. तुला कोंबडे किती? मला किती च्या हिशोबात थांबलेल्या ट्रेनला घाट चढण्यासाठी लागलेलं इंजिन
धक्का देई आणि गाडी परत सुरू होई. रानमेवा म्हणून केळी विकत नसल्याची कारण मिमांसा
नंतर कळली. ह्या केळांमध्ये ज्वारीच्या किंवा काळ्या वाटाण्याच्या आकाराच्या
मोठ्या मोठ्या बिया असतं. त्यामुळे ही केळी खाण्यायोग्य नसत. खूप कालावधीनंतर
आदिवासी क्षेत्रात काम करणार्या एका मित्राने सांगितलं की रानात राहणारे हे वनवासी जन्मलेल्या नवजात अर्भकाला ह्या केळाच्या
बिया सहाणेवर दुधात उगाळून चाटवतात. तेच
त्यांचं लसीकरण! सर्व रोगांना तोंड देण्याची प्रतिकारशक्ति ह्या बियांमधून त्यांना
मिळते. कोणी लसीकरणासंबंधित संशोधन करत असेल तर त्यांनी हे जरूर तपासून बघावं.
पाठीवर गोंडस
लेकराचं मुटकुळ आणि डोक्यावर लांबलचक काटक्याकुटक्यांचा भारा घेउन कॅटवॉकलाही
लाजवतील अशा चटचट खडे पहाड उतरून जाणार्या वनवासी मुली आणि त्यांच्या चवळीच्या
शेंगेसारख्या अंगकाठ्या आजही माझ्या नजरेसमोर जशाच्या तश्या उभ्या राहतात.
रापलेल्या तांब्याप्रमाणे रंग आणि त्यांचे गोड चेहरे आजही मला भावशून्य रँपवॉक
करणर्या डोईवर ही लोंबकळ हॅटफिट घालणार्या मुलींपेक्षा खूप सुंदर वाटतात.
पळसदरी किंवा ह्या आजुबाजूच्या डोंगरमाथ्यावर गाडी
लेट व्हायला माझी परवानगी असे. फेब्रु- मे पर्यंत तर दर्याखोर्यात केशरी फुलांनी
लगडलेली पळसाची झाडं लक्ष वेधून घेत. जंगलात पळसच पळस फुललेले असत. आगगाडीतून
जातांना जंगलात फुललेले अनेक अनेक पळस आकाशात केशरी प्रकाशझोत पसरल्याप्रमाणे
दिसत. जणु काही उत्तर वा दक्षिण ध्रुवावरून चुंबकीय कणांनी साकारलेले Aurora Borealis आणि Aurora Australis च!
पावसाळा असेल तर
वातावण मोठं रम्य असे. हिरव्याच्या अनेक रंगछटातून रानात पक्ष्यांच्या विष्ठांमधून पडलेल्या पळसबिया
रुजून ठिकठिकाणी तिन पर्णिका जमिनीतून बाहेर डोकातांना दिसत. नवीन पानांचे पोपटी
रंग पालापाचोळ्यातून उठावदार दिसत. सर्व शाळेची मुलं गणवेशधारी
असली तरी त्यांची कोवळीक आणि उंची पाहून ती पहीली, दुसरी,
पाचवी अशी ओळखता यावीत त्याप्रमाणे एक वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची- ---- अशी उंची कतारने पळसबाळं ओळखू येत. उगीच गुणगुणायला होई,
आला आला पावसाळा
तीन पानं पळसाला
दूर सारीत पालापाचोळा.
लोटून दगड अधला मधला
तीन पानांचा पळस उगवला
पळसाचं फूल मला पृथ्वीच्या
कललेल्या आसाप्रमाणे वाटतं. त्याच्या ह्या Asymmetry मधे पृथ्वीची Symmetry भरली आहे
असं वाटतं.
1999 साली
पहिल्यांदा नागपूरची ओळख झाली. जालना, अकोला,
नागपूर फिरता फिरता, रवी भवनमधे रहायला आलो.
हे मंत्र्यांचे बंगले फक्त सेशनकाळात गजबजून जात बाकी 10 महिने ऑफिसर्सना रहायला मिळत. ह्या बंगल्यामधे एक सर्वात
मस्त गोष्ट म्हणजे घराच्या मागच्या
बाजूला लागून
चारी बांजूंनी भिंतींनी बंदिस्त असा चौक होता. म्हणजे अंगण म्हणू या
फार तर. भिंती चांगल्या पंधरा फुटी पक्या विटांच्या असल्यानी चौक
सुरक्षित होता. छप्पर मात्र निळ्या आकाशाचं! वारा, पाऊस,
ऊन, चांदणं आणि पक्ष्यांनाही यायला मज्जाव नव्हता. बंदिस्त घरात झोपण्यापेक्षा
आकाशाखाली झोपायची कल्पनाच आम्हाला मोह घालून गेली. उंच भितींमुळे कुत्री, प्राणी आत यायाची काळजी नव्हती. रात्री आकाशात असंख्य तारका
एकमेकांशी त्यांचे इवले
इवले ओठ हलवत सतत काय बोलत
असाव्यात? रात्रभर त्यांच्या
गप्पा चालूच असत.
कणाकणाने गडद होत जाणारी
रात्र सगळ्यांना अंधाराच्या बोगद्यात घेऊन जाई आणि कणाकणाने प्रकाशमान होत जाणारी पहाट
अंधाराच्या बोगद्यातून जीवनाच्या आगगाडीला बाहेरच्या प्रकाशमय जगात फिरून घेऊन येई. सर्वांनी आकाश,
झाडं पाहिली असली तरी अंधारा बोगदा संपला की फिरून निळ, आकाश, हिरवी झाडी पाहून गाडीतील सर्वांच्याच तोंडुन अद्भुत
रम्य जग पाहता एकदम हाऽऽऽ!!!
अशी उद्गारवाचक प्रतिक्रिया निघावी तशी पहाट होताच रम्य जाग येई. घराच्याच बाहेर तीन तीन मोठ्या मोठ्या पर्णदलांचे तळवे
हलवत फुल्लकुसुमित पळस बाहेरून चौकात डोकावत हसत उभा असे. त्यानी घरात डोकावून
बघायला आमची ना नव्हती. रात्रीच्या अंधारात पळसाच्या दिसणार्या काळ्या आउटलाईन मधे उषा
तिचे गहिरे रंग भरायला सुरवात करे. आहाहा! काय हा
दिमाखदार भगवा रंग! कदाचित डोळ्यात भरणारा हा रंग पाहूनच फार पूर्वी भारतीयांनी भगवा ध्वज स्वीकारला असावा. डोळे उघडताच सार्या पळसावर तजेलदार केशरी ज्योती तेवतांना दिसत. तर गुलाबी पळस मैनांच्या प्रचंड बडबडीनी, धावपळीनी सगळा परिसर गजबजून गेलेला असे. पळसाच्या
बाकदार फुलाचे पोपटाच्या चोचीशी साधर्म्य पाहून पळसाला संस्कृतमधे ``किंशुक’’ म्हणजे ``काय पोपट तर नाही?’’ असं गमतीशीर
नाव पडून गेलं. पळस आणि होळीचं खरतर रंगपंचमीच घट्ट नातं आहे. पळस फुलतोच होळीच्या
सुमाराला. आपले सगळेच सण निसर्गात असे घट्ट गुंफले आहेत. पळसाच्या फुलांपासून
केलेला पूर्ण नैसर्गिक रंग जोवर रंगपंचमीला वापरला जायचा
नाही तोवर रंगपंचमी ससाग्रसंगित झाल्यासारखे वाटत नसे.होळी आपण परप्रांतियांच्या
रेट्यामुळे स्वीकारली नाहीतर रंगपंचमी हाच महाराष्ट्राचा सण!
पळसाला गंध नाही म्हणून संस्कृतमधे ह्या झाडाला उगीच फार हिणवलं जायचं असं वाटलं. रूप, तारुण्य मोठ्या कुळात जन्म सर्व मिळूनही विद्या न शिकलेला माणूस गंधहीन पळसासारखा
असतो.
रूप-यौवन-सम्पन्नाः विशाल-कुल-सम्भवाः
विद्याहीनाः न शोभन्ते
निर्गन्धाः इव किंशुकाः ।।
पाण्याला थोडाच गंध असतो! पण पाण्याशिवाय कोणी
जगतं का? इतक्या पळसमैनांना आवडणारी जाडसर पाकळ्यांची
फुलं सुवास नाही म्हणून कमी प्रतिची ठरवावीत हे --- हे त्याच्यावर अन्याय करणारं वाटायचं.
असो! पळसाचं
मनात वसललं रूप शब्दांमधे उतरवतांना लेखणी लिहीते,
वृत्त वसंततिलका –
ज्योती अखंड जणु तेवत केशरी ह्या
ज्योतिर्मयी रुचिर उत्सव चालला हा
ह्या शेलट्याच पळसावर रंगदार
ज्वाळांस कोंब फुटलेच तजेलदार
सार्या वनी पळस हे फुलताच साचे
वाटे प्रकाशमय झोत नभात नाचे
नाहीच दाहक परी अनला प्रमाणे
हे शांत तेज विलसे पळसाफुलांचे
रंगोत्सवा बघुनियाचि थवे द्विजांचे
मैना करी कलकलाट अतीव मोदे
ज्वाळा अखंड जळती हसती रवीला
हे आतपी सुखविती मम अग्निज्वाला
हा होलिकोत्सव असे वनि देखणा गं!
मी जाळिलेच शिशिरा म्हणतो निसर्ग
-----------------------------------------------------
लेखणी अरुंधतीची-
.jpg)

.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment