सांब सदाशिव

 

सांब सदाशिव

14 : 14

स्वेदगंगा वाहते नित ।  कष्टणार्‍या देहांवरी

मंथिता संसार सागर ।  कालकूटचि आले करी।।

प्राशितो जहाल जहरही । परि न देतो कोणासही

ठेवितो रोधून कंठी । न ये मुखी न जाई उरी ।।

प्रतिपदेची कोर इवली । आशारुपी धरली शिरी

ती उतारा ह्या विषाला । सान असली तरिही खरी ।।

जन-जिभांचे हे विखारी । सर्प रुळती अंगावरी

 चिता जाळुन कामनांची ।  भस्म लावी अंगावरी।।

जनापवाद यज्ञामधे ।  जळुन जन्मे राखेतुनी

उमारूप मनिची उमेद  । ती शिवाची अर्धांगिनी

बोचताती थंड नजरा ।  प्रेम करुणा जिथ गोठली

कैलास निर्दय पाहुनी  । बसे निर्मम हा त्यावरी ।।

समाज-नंदि माजताचि । स्वार होई त्याच्यावरी

घालून त्या घट्ट वेसण । हा आणितो वठणीवरी।।

संहारुनी जाचक रुढी । रुंडमाळा मिरवी उरी

कालद्रष्टा दूरदर्शी ।  नेत्र तिसरा भाळावरी ।।

कातडे ओढून नयनी । दृष्टिआड अन्याय जनी

डोळ्यांस करुनी नागवे । तेचि चर्मांबर पांघरी ।।

त्रिशूळ धरुन हाती कसा । हा स्वस्थ चित्तचि बैसला

नेत्र अर्धोन्मीलित ह्याचे । का आत्मचिंतन जनहिता।।

शब्द जो उमटे मुखातुन । डंकार तोची डमरुचा

जागवी खडबडुनी पुन्हा  ।  समाज स्वस्थ जो झोपला।।

त्रिनेत्र तोचि विस्फारिता  । माजे हलकल्लोळ महा

 त्राहि त्राहि दुष्ट म्हणती । सांब सदाशिवचि जागला ।।

क्रोध याचा तो भयंकर । गर्भगळितचि सारे जगी

होत निप्पातचि खलांचा । ऐसेचि तांडव भयसुरी।।

जाहला मग शांत शिव तो । नेत्र मिटुनी पद्मासनी

भरुन उरे सांब सदाशिव । घोष सार्‍या हृदयातुनी ।।

----------------

 

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

वादळ 1

कडुनिंब 2