एक प्रभात
एक प्रभात
पूर्वेला लालबुंद सूर्यबिंब वर येत असतांना पश्चिमेला अस्ताला जाणारं चंद्रबिंब मावळतीला चाललय. दोघांच्या सोबत त्यांचं रंग सैन्यही एकवटून त्यांच्या पाठीशी आकाशात उभं आहे.
सूर्यासोबत सर्व प्राचीच लाल, पिवळ्या, केशरी नारिंगी रंगानी दाटलेली नटलेली असतांना,
डोक्यावरचा फिकट होत जाणारा निळा आकाशघुमट पश्चिमेला मात्र गडद निळा रंगलेला. चंद्रासोबत
असलेल्या रुपेरी सैन्य किरणानी अपूर्वेला गडद निळ्या घुमटावर चंदेरी जाळं टाकलेलं.
अशा क्षणाची साक्षी होण्याचं भाग्य लाभलं आणि ते क्षण श्रीमंत करून गेले.
पुनवेच्या त्या प्रातःकाली
सप्तर्षींची सभा संपली
नील तलम अंबरी तारका
नक्षत्रहारातुन ओघळली ।। 1
सहस्ररश्मी रक्तबिंब
ते
प्राचीवर आरक्त जाहले
अपूर्वेस का रुपे वितळले
चंद्रबिंब ते सुहास्य
विलसे ।। 2
सौंदर्याचे महारथी
ते
तेजाचे का दोन प्रतिनिधी
एकामेका
आज भेटले
आकाशाच्या तीरांवरती
।। 3
रंगांच्या भाषेत बोलले
परस्परांशी चंद्र रवी
जिथे कौतुका शब्द न पुरती
तिथे रंग हे काम करी ।।4
"शुभ्रभानु तू कलानिधी तू
कुमुदप्रिय हे निशाकरा
थांब जरासा रवी बोलला
नभोदीप हे सुधाकरा''
।।5
शीतांशू तो हात जोडुनी
सौम्य सौम्य वदता झाला
“तमोभेदि हे सहस्ररश्मी
तेजोनिधि रे नमन तुला
'' ।।6
मोहित दोघे परस्परांवर
किती उधळले रंग तयी
गुणी जाणतो गुणी जनांना
प्रत्यय त्याचा
दिसे नभी ।।7
लाल केशरी सोनसळी
अन
निळे जांभळे
जरतारी
तांबुस पिवळे रंग स्तुतीचे
नभी विखुरले
कितीतरी ।। 8
स्तुतिरंगांनी प्रभात
न्हाली
रंगांची बरसात नभी
स्तब्ध होऊनी बघत राहिली
आम्रमंजिरी नवी नवी ।। 9
मान उभारुन
कल्पतरूही
बघत राहिला
मैत्र अशी
वसंत सुंदर नभी प्रकटला
रंगांची बरसात नवी ।। 10
काळ न थांबे कुणाचसाठी
चंद्र बुडाला
नीलनभी
हलके आली जाग सृष्टिला
रवी उदेला पूर्वदिशी ।।11
मुदित जाहले द्विजगण
सारे
मैफिल रंगांची
त्यांनी
आज गुंफिली
सुरांमधे
ती
किरणांची आतशबाजी ।।12
-------------------------------
लेखणी अरुंधतीची
–
(तुझी कविता वाचून माघाच्या काव्याची आठवण झाली. एकाच वेळी आाकाशात चंद्र आणि
सूर्य यांचे दर्शन होते आणि आकाश हे एखाद्या हत्तीप्रमाणे दिसत आहे. ज्याच्या पाठीवरून
सूर्य आणि चंद्र ह्या दोन घंटा लोंबत आहेत.
ह्या रूपकावरून त्याला घंटा माघ असं म्हणतात.)
Comments
Post a Comment