श्रावण
श्रावण
जरा जरा सावली जरा जरा
ऊन,
अचानक पावसाची सर जाते
भिजवून
आकाशी दाट निलीमा, अन् येतं आभाळ भरून
रात्री एखादि दुसरी चांदणी
चमचमते मेघांमधून
निसर्गानं भरभरून दिलेलं
दान; वसुंधरेचं नितांत समाधान
चैतन्याचं निधान म्हणजेच
श्रावण आल्याचं प्रमाण!
धारा आणि किरणांची सप्तरंगी
देखणी गुंफण
उलगडत हळु हळु करते आकाशी
आरोहण
लाल, केशरी पिवळा उजळतो संधीप्रकाश
प्रकाशात त्या उजळून निघते
वसुंधरा ही खास!
जुन्यावरही मुलामा बसतो
सोनसळी चमकदार
जुन्या वास्तु लख्ख होतात
हा श्रावणाचा चमत्कार!
नभी उमटते चित्रनगरी,
उजळल्या रंगांची बरसात
हत्ती घोडे उंट पालख्या
न कळे कोठे जातात.
परिमल नाना पुष्पांचे
ते, वार्यावर तरंगत येतात
सुस्नात, निर्मळ हवा,
वायू लहरी चित्त प्रफुल्लित करतात.
मरगळ दूर करून देतो जो उत्साहाचे वरदान
बारही महिन्यांत तोच वरिष्ठ!
श्रावण आनंदनिधान!
जाई, जुई, चमेली, लिली,
सायली मदनबाण
घराघरावर सुंदर सजली रम्य
फुलांची कमान
आघाडा, दुर्वा, फुली,
तेरडा, पत्री, शमी गुणवान
नाही कशाची कमतरता निसर्गाचं
नवनिर्माण
समृद्धीवर सौख्याच्या
तुर्याचा बहुमान
आनंदनिधान श्रावण हे वसुधेला
वरदान
व्रतं, वैकल्य, नियम,
जिवती, राणुबाई गुणगान
गणपतीच्या दोंदावर पाय
, हाती फळ एक महान
कहाण्यातील आटपाट नगर,
सुफळ होण्याचं वरदान
हळदीकुंकू निमंत्रणं,
उद्यापनं ह्यांचे अग्रस्थान
गरम मसाला दुग्धावरती
केशर विराजमान
फुटाण्याची खिरापत हा श्रावणी शुक्रवारचा मान
पैठण्या अन् पोचमपल्ली,
गर्भरेशमी महिमान
नव्या नवेल्या विविहितांना
शोभून दिसतात छान
मंगळागौरी, खेळ, जागणे
उत्साहा येते उधाण
खेळता खेळता रात्र सरते
उत्साहाची चढती कमान
वाटत जातो प्रत्येकाला
असीम उत्साहाचं वाण
हाच तर तो श्रावण निःसीम
आनंदनिधान!
भाताची मूद त्यावर वरण
विराजमान
पुरणपोळी , तूपाची धार
नाही अनमान
सोमवारी संध्याकाळी शिवाला
नैवेद्य हवा दही भात
मंगळागौरीचा उपवास सोडण्यास
खिचडीला बहुमान
कर्दळीचे खांब, चौरंग
लाल, पूजा यथासांग
सत्यनारायण प्रसन्न होऊन
प्रसाद देतो छान
लक्ष दूर्वा, लक्ष बेल,
लक्ष तुळशी, लक्ष सुमन
कृतार्थ होतात आराध्याला
वाहून हे भक्तजन
जुने पुरातन दूर करुन
जो करतो नवनिर्माण,
नाविन्याने रसरसलेला असा हा श्रावण आनंदनिधान!
पांचालीचा शोभे जसा, सखा कृष्ण भगवान
तसा सार्या ललनांचा, श्रावण आनंदनिधान
---------------------------
Comments
Post a Comment