गुलमोहोर -
गुलमोहोर -
गुलमोहोराची नजाकतीने उभी असलेली
झाडं मे महिन्यात सर्वांचच लक्ष वेधून घेतात. थंडीमधे भुरुभुरु पान गाळणारी ही
गुलमोहोराची झाडं सारा अहंकार झाडून, सर्व ऐश्वर्याचा त्याग करून व्रतस्थ
होतात. ध्यानस्थ बसतात. सर्व संपत्ती दान केलेल्या रघुराजासारखी भासतात. तर कधी
झाडांचा नुसताच फांद्यांचा उरलेला सांगाडा पाहून मला दधिचींची आठवण येते. इंद्राला
वज्र बनविण्यासाठी आपली हाडे अर्पण करण्यासाठी दधीची ऋषी ध्यानस्थ बसले होते.
त्यांच्या अंगावर पोपड्यासारखे उरलेले कातडी व मास कामधेनुने चाटून काढून टाकले.
आता उरला फक्त हाडांचा सांगाडा. वज्र बनविण्यासाठी उपयोगी. तसच काहीस हे झाड वाटत.
रिकाम्या झाडावर लटकणार्या गडद तपकिरी चपट्या बीजमंजुषांमधेही त्याची बीजे
ध्यानमग्न असतात.
वैशाख वणव्यात सूर्याच्या प्रतिमेचे
स्मरण करता करता झाडावरही केशरी , पिवळसर केशरी, फिके केशरी, गडद केशरी , लालबुंद असे झाडागणिक विविध रंगातील गोलक अवतरायला लागतात. आणि बघता बघता
दहा पंधरा दिवसात सार झाड लाल, केशरी फुलांनी असं काही बहरुन येत की एकही फांदी दिसू नये.
कधी आकाशाकडे बघत हात पसरलेल्या
ह्या लालचुटुक छत्र्या दिसतात. तर कधी ह्या झाडाच्या चिवट बारीक फांद्या
जमिनीपर्यंत खाली झुकतात. जमिनीला स्पर्श करायच्या आधीच हत्तीच्या सोंडेसारख्या
परत वरती वळतात. वरून ओघळणार्या ह्या माणकांच्या सरी मला भारी आवडतात. कधी
हिरव्या, पोपटी मखमाली पानांच्या कोंदणात माणिक, पोवळी बसवलेल्या
ह्या रत्नजडित तरुवरांचे गुलमोहोर ऐवजी माणिकमोहोर हेच नामकरण मी करून टाकते.
झाडाखालून जातांना लाल गालिच्यातील
एक फूल उचलून घेतांना मला कायम वाटत, गुलमोहोराच्या पाच पाकळ्यातील चार
लाल लाल पाकळ्यांच्या सोबतीने एकच पाकळी अशी उठून दिसेल अशी वेगळी का बर? थोडीशी जाड पिवळट
पांढरट वर लाल रेघा असलेली पाकळी मी हातात घेऊन पाहू लागते.
गुलमोहोराच्या ह्या पाकळ्यांचा
आकारही किती वेगळा. बहुतेक फुलांच्या पाकळ्या वरच्या टोकाकडे निमुळत्या होत जातात.
ही वरच्या बाजुला गोलाकार आणि आतल्या बाजूस निमुळती होत गेलेली. हिचा वेगळा आकार
कशासारखा दिसतो बर? आठवता आठवता डोळ्यापुढची पाकळी धूसर होत अचानक मला ती
पांडुरंगाच्या कपाळावर रेखलेल्या गंधासारखी दिसू लागते.
गुलमोहोराचं झाड कितीही लांबून
पाहिल तरी ते नुसतच लाल/केशरी दिसत नाही. त्याच्या ह्या पाढर्या गंध-पाकळीची
नक्षी लांबूनही त्या लाल केशरी झाडावर जणु पांडुरंगाची गंध मोहोर उमटल्याची साक्ष
देत असतात. कधी पांडुरंग त्याच्या कपाळी गंध रेखून जातो न कळे. इतकी वर्ष नजर
ठेऊनही मी गुलमोहोराच्या कपाळावर गंध रेखून जाणार्या त्या पांडुरंगाला पाहू शकले
नाही.
------------------------------
माणिकमोहर
(गुलमोहर) /गंध पाकळी
8; 8; 8; 3
तरुवर सुंदर उभा राहिला लेऊन वसने
लाल
भरजरि वस्त्रे अनुपम
त्याची काय ऐट तो डौल
पाचूची पानडी तयावर माणिक
पुष्पे लाल
माणिक पाचू रत्न-सरींसी झुलवीत अंगावर
वार्यावरती हेलकावते
लक्ष्मी तीच गजान्त
पायापाशी अंथरलासे गालिचाच
आरक्त
एक पाकळी परी वेगळी सुमनांच्या
झेल्यात
वेधुन घेते चित्तचि माझे
मन करे आकर्षित
दूरवरुनही रेशिम बुट्टे
दिसती हेची खास
लाल शालुवर साज चढवती
नाही उपमा त्यास
उचलुन घेते फूल कौतुके
निरखुन पाही त्यास
धूसर झाली तोच पाकळी
नयन पाहती काय?
टिळा चंदनी विठू कपाळी
दिसू लागला त्यात
रंग रूप आकार तोच तो
मज दिसे पाकळीत
गंध पाकळी विठू कपाळी
तरू कपाळी कशी
लावुन जाई विठूमाऊली फुलाफुलांवर
कधी?
---------------------------------------------
Comments
Post a Comment