पावसाची पाककृती

 

पावसाची पाककृती

पाऊस समजाऊन सांगायचाय  चिल्ल्यापिल्ल्या बालमित्रांना छानशा भाषेत ! ढग तयार व्हायची सारी प्रक्रिया, त्यांचे पहिल्यापासून विविध प्रकार Cirro, Cumulo, Strato, Nimbo सांगायचा छोटासा प्रयत्न!

 

आकाशाच्या हंड्यामध्ये । सूर्य बाष्पकण रोज साठव

तळ्यामधुन वा, मळ्यामधुन वा । जलधीतुन वा, जलकण जमवी

 

सूर्य किरण ते, जलबिंदुंसी । नद्यांमधुनही, आणी उचलुनि

पाणवठे होतीच कोरडे। जाती विहिरी, बारव सुकुनी

 

वारा घुसळे, बाष्पबिंदु ते । नभाचिया हंड्यात चांगले

इथे तिथे मग, दिसू लागती । तुरळक मेघांचे फरकाटे

 

वाटे कुठला, हा सांगाडा । फासळ्याच जणु, मासोळीच्या

अजुन काळ काहीच घुसळता । जमिनीवरुनी दिसे नजारा

 

हळु हळु लोणी, येऊ लागे  । तसे विस्कळित, ढग्गू गोळे

दिसू लागती, आकाशीच्या । भल्याच मोठ्या, हंड्यामध्ये

 

तरिही राही, घुसळत वारा । एकत्रित करि, मेघ-गोलका

निळ्या जांभळ्या, तयार होती । आकाशी मग, मेघमालिका

 

आकाशाच्या, काहिलीमधे । नवनीताचे, तूप करावे

तसेच पाणी पाणी होई । धरतीवर मग पाऊस येई

-----------------------------------

लेखणीअरुंधतीची-

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

उशाशी -

हे राष्ट्रदेवते भारतमाते