कृष्ण चतुर्दशीची पहाट
कृष्ण चतुर्दशीची पहाट
शर्वरी सरे हळुवार
थोडा प्रकाश थोडा अंधार
रातकिड्यांची किरकिर
चरचरत कापी अंधार
कोकिळेचे नवखे पोर
तानेत होई बेसूर
झोपला शांत जनसागर
निशीगंध जाणवे नाकावर
हिरवी वाट ओलसर
शांत नभीचा सागर
पूर्वेला आली वर
अपूर्व सुंदर चंद्रकोर
किंचित कलती रेखीव
गोड हासरी गंभीर
आमावस्या पावलावर
तरी अविरत शांत निश्चल
धर्म भास्कर मागोमाग
सांगे काळरात्र अजरामर
पांडवांपासून अती दूर
कृष्ण भिल्लाच्या मांडीवर
पायात घुसला तीर
तरी डोळ्यात थेंब ना नीर
उदयाहूनही गहिरा
पाहिला एक अस्त सुंदर
-----------
Comments
Post a Comment