खारुताई
खारुताई
शेवगा फुलावर येवो वा अंब्याला बाळ कैर्या लागोत खाली पडणारा
पांढर्या पाकळ्यांचा सडा वा कैरीच्या सालांचा हिरवा चुरा वर बसलेल्या खारुताईंची वर्दी
देऊन जाई. पोपटही कैर्यांवर ताव मारतांना झाडाखाली यथेच्छ सांडत, पण त्यांचा गप्पीष्टपणा
घरातूनही कळत असे. खारुताईंची उपस्थिती फक्त वरतून अखंड भुरभुरणार्या सालं वा पाकळ्यांमुळेच कळे. आपण
नजरेनी झाडवर खारूताईचा शोध घेऊ लागलो तर तीही
तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी खाली वाकुन टुळुटुळु आपल्याकडेच पाहतांना दिसे.
मधुनच तिचा शेपीचा गोंडा उडवतानाही तिचं तोंड अखंड चालू असे. जरा जरी धोका वाटला तर
झुमझुम पळून जाई,
एखादी वेल स्वतःला गुंडाळत झाडावर चढत जावी तशी तशी झाडाभोवती
गिरक्या घेत वर चढणारी; खाली उतरणारी खारुताई आणि तिच्यापाठी तिचा पाठलाग करणारी दुसरी
खारुताई हे नेहमीचं गोड वाटणारं दृश्य पहायला मला फार आवडायचं
शेवगा लागला बहरू, सजला फुलांनी तरू
धांदलीने वरखाली, लागली खारुताई फिरू
इकडे तुरुतरु, तिकडे तुरुतरु,
तोंड तिचे चालू, सारखे कुरुकुरु
फुलांचा झुपका हातात धरुधरू,
खाई कुरुकुरू, पाकळ्या चुरुचुरू
जमिनीवर सडा शुभ्र भुरुभुरू ,
वसंतातही जणु हिमवर्षाव सुरू
मुलखाची घाई, झुपकन पळून जाई
सतत कसली लगबग, जरा स्वस्थपणा नाही
खायची तिला घाई, टकमक डोकावे खाली
उडवत गोंडा शेपटीचा, उगीचच वरखाली
मोठे मोठे डोळे तिचे, भरली त्यात भीती
चौफेर टेहाळणी तिची, धोक्याने सतर्क होई
चुक चुक आवाज काढत, धूम पळून जाई
जाता जाता तोंडात खाऊ बाळासाठी नेई
मग--- अशी गोंडस, चपळ, सतर्क खारूताई झाडावरून वारंवार खाली
का बरं पडावी? अशा जखमी खारुताईला मनुताई तोंडात उचलून घरी घेऊन आली आणि मी ‘‘अगं अगं
सोड तिला’’ म्हणाले; तिला वाटलं मला खार खायला आवडत असावी. मग बागेत पडलेल्या अशा खारी
ती माझ्यासाठी घेऊन येऊ लागली. तोंडातून गुरगुर आवाज काढत घरामधे मला शोधत थेट ती खार
घेऊन माझ्यापाशी येई. माझ्या पुढ्यात अलगद ठेऊन डोळे अलगद उघडमीट करून ‘‘घे ही खार’’
म्हणे. आणि स्वतः शांतपणे बाजूला स्वतःभोवती शेपूट गुंडाळून आवरून सावरून बसे.
ह्या जखमी पण जिवंत खारींना वाचवण्याचा माझा प्रयत्न सुरू
होई. फळं ठेवायच्या प्लॉस्टिकच्या जाळीदार क्युबिकल मधे मऊ मऊ फडक्याची गादी तयार करून
अलगद तिला निजवणे, ड्रॉपरने कण कण पाणी, दूध,
पपई, केळ, पेरू वा सफरचंदाची फोड ठेवत घरातच ‘शुश्रुशा’ हॉस्पिटल सुरू होई. कधी कधी तरतरीत होत चाललेली, खाऊ खाणारी खार आतल्या
आत फिरुही लागे. रात्री खारुताईला जाळीच्या क्युबिकल वरचं फडकं अलगद दूर करून पाहिलं
की स्वतःची शेपूट पाठीवरून दुलईसारखी ओढून झोपलेली दिसे. सगळच कसं गोंडस असे. पण तीन
चार दिवसापुढे हया खारी टिकत नसत. नंतर बारकाईनी पाहिल्यावर लक्षात आलं ह्या झाडावरून
पडलेल्या सर्व नर खारी असत आणि त्यांच्या बीजांडांना जखम झालेली असे. झाडावर एकमेकींशी शिवाशिवी, लपाछपी खेळणार्या खारींचं प्रत्यक्षात
एकमेकांशी तू तरी राहशील किंवा मी तरी असं भीषण युद्ध चाललेलं असतं तर! दुसर्या नराला मारायचा प्रकारही क्रूर! बीजांडालाच
चावा घ्यायचा! तो कोसळलाच पाहिजे!
बकुळीखाली फुलं वेचता वेचता एकदा एक नर माझ्यासमोर बद्दकन
खाली पारावर पडला. पार दगडाचा असल्याने जोरदार मार लागला होता. वाचण्याची शक्यताच नव्हती.
त्याला एका कर्दळीच्या पानावर ठेऊन अखेरचा
पाण्याचा थेंब द्यायचा प्रयत्न केला त्यानेही तो थेंब गिळला. मोठे मोठे डोळे ग्लानीनी मिटलेले. शेपूट पार कर्दमलेली--
पाण्यात भिजल्यासारखी चपटी! माझ्या हातातल्या पानावर तो जीव मंदमंद श्वास घेत असतांनाच
शेपटीच्या टोकाकडून संथ गतीने त्याची शेपूट फुलायला सुरवात झाली. शेपूट पूर्ण फुलल्यावर
त्याच्या अंगावरचे चिकटलेले केसही ताठ होत होत होते. कसली एक अदृश्य लहर शेपटीच्या
टोकाकडून पुढे सरकतांना जाणवत होती. बघता बघता मिटलेले डोळे सताड उघडले गेले . लुळं
पडलेलं शरीर एकदम ताठ झालं. आपल्या डोळ्यादेखत यमानी त्या छोट्याशा जिवाचं चैतन्य शेपटीपासून
अलगद ओढून घेत डोळ्यावाटे काढून पाऊलही न वाजवता निघून जावं----- आपल्या ओंजळीतील एक
जीव असा जातांना पाहून निशब्द झाले. आजही झाडावर एकमेकींचा पाठलाग करणार्या खारी पाहिल्या
की प्रत्येक जाती जमातीत महाभारत, रामायण सुरू असल्याची ग्वाही मिळते.
------------------------------------
.jpg)
Comments
Post a Comment