निर्झर

 

निर्झ

 

खेळत होता निर्झर रानी

गात चालला मंजुळ गाणी

वळे जरासा पळे पुढे तो

खडकांवरुनी घेत उडी ।। 1

 

नितळ तयाची नीलम काया

आरसपानी अमृतछाया

कडेकपारीतुनी निनादे

घुंगुरवाळा पायीचा ॥2

 

उभे वृक्ष ते काठावरती

आशीर्वचने देत तयासी

खळाळून तो हासत जाता

फुले उमलती त्या काठी॥3

 

रोज येतसे भेटुन त्याला

सौंदर्याने मोहुन त्याच्या

कितिही घेता चित्रे त्याची

घ्यावे वाटे अजुन एकची॥4

 

एकाहुन ती एकचि सुंदर

रसिक, मासिका दिली पाठवुन

चित्रे त्याची मी टिपलेली

मुखपृष्ठासी गेली सजवुन॥5

 

कौतुक त्यांचे जनी जाहले

पुरस्कारही किती मिळाले

मनी तोषलो तेंव्हा मीही

रसिका मी हे काय दिले॥6

 

बुडून गेलो व्यापामध्ये

माझ्या माझ्या कामामध्ये

विसरुन गेलो निर्झर सुंदर

वेड जयाचे मनामधे॥7

 

कितिक दिसांनी येता परतुन

पाहण्यास त्या अधीर तनमन

जलमय तनु कमनीय बघाया

शहरातु मी, आलो धावुन 8

 

ओठावरती शीळ घेऊनी

मनामधे मी स्वप्न फुलवुनी

वायूच्या घालून खडावा

भेटाया गेलो रानी॥9

 

हाय काय हे !  बघता कळे

दाटुन आले दुःख उमाळे

कचरामय तो परिसर सगळा

पाहुन नेत्री नीर ढळे॥10

 

गाणारा तो निर्झर अल्लड

उड्या घेत जो जाई दुडदुड

पाउल ज्याचे भलते अवखळ

गलितगात्र तो आज दिसे॥11

 

आज अडखळे क्षणाक्षणीसी

दगडांवरती ठेच लागुनी

त्राण उरले गात्री त्याच्या

पाउलभरही जाण्यासी।।12

 

प्लॅस्टिक पिशव्या, कागद बोळे,

साचुन आले वर शेवाळे

कंठी अडले गाणे त्याच्या

 रंगहि त्याचा लव कळे॥13

 

रानफुलांचा परिमल धावे

प्रसन्न करण्या परिसर जेथे

बिड्या,थोटके, तंबाखूचा

आज सांडला सडा तिथे॥14

 

पवित्र गंगा वाहत होती

अंगा अंगा मधुनी साची

गटारगंगा तिला बनविली

माणुस या हैवानानी।।15

 

खिन्न मनाने उभा स्तब्ध मी

त्या निसर्गपुत्राच्या काठी

नव्हते कळले कधी मला रे

मरण तुझे माझ्या हाती।।16

 

 

कशास काढुन चित्रे तव मी

नीरवस्त्र या नीलम-तनुची

दाखविली का हैवानांना

लुटले पुरते तुज त्यांनी॥17

 

 

उतलेले बेलगाम बघुनी

हे नागरीक उद्दाम कुणी

निसर्ग चित्रे टिपण्याचा मम

छंद सोडिला त्याच क्षणी॥18

--------------------------------------------

 

 

 

Comments

Popular posts from this blog

कविता अनुक्रमणिका

sip your Coffee-

कडुनिंब 2