माझी मराठी
माझी मराठी
वार्तालाप करेन नित्य
मधुरा मी मायबोलीमधे
माते स्तन्यचि अमृतासम
तुझे वाणीस चैतन्य दे
जेथे जन्मचि घेतला जननि
मी मातीत ज्या येथल्या
आली पावन संस्कृती रुजुन
जी ती धन्य वाटे मला ।। 1
झाली जागृत अस्मिता मम
मनी ह्या मायबोलीमुळे
सांगे थोर परंपराच मजसी
त्या शौर्य धैर्यासवे
त्यागाच्याच कथा विलक्षण
महा त्या पूर्वजांच्या भल्या
येई चित्त उचंबळून मम
हे मी ऐकता त्या व्यथा ।। 2
केले काय न काय काय जननी
मोठे कराया मला
ज्ञानाचा खजिना अमोघ
दिधला ह्या अज्ञ बाळा तुझ्या
``सारे विश्व असेचि हे
घर तुझे’’ दे
आत्मविश्वास हा
``पादाक्रांत करे धरा सकल
ही’’ विश्वास
हाची दिला ।। 3
समृद्धी मजला अपार दिधली
माते तुझा मी ऋणी
भाषानंदनकाननी द्विजच
मी गातो स्तुती तोषुनी
ह्या विश्वात कुठे कुठे
फिरत मी ओठी तुझे गीत गे
चित्ती हे ठसलेच वैभव
महा वाणी मराठी तुझे ।। 4
--------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment