कर्तव्य हीच पूजा मानून घे गणेशा
कर्तव्य हीच पूजा मानून घे गणेशा
कर्तव्य सर्व माझे,
मानून ईश पूजा
करितोच चित्तभावे, मी हीच कर्मपूजा
आरास पुष्पमाळा, मखरात दीपमाळा
ना लावल्या गणेशा, परकीय वस्तुमाला
वेळेवरी तुला मी, न
अर्पिला धूप दीप
नैवेदय मोदकांचा, मिळता मजलाच वेळ
जास्वंद केवडा वा, कमळे, शमी अघाडा
ना वाहिल्या गणेशा, पत्री न दुर्वाजुड्या
साधून मी चतुर्थी,
दूरस्थ मंदिराला,
जातो कधी न पायी, सोडून विहित कर्मा
स्वीकारले मनाने, जे काम नित्य माझे
करतोच पूर्ण सारे, जयजय गजानना रे
झालीच पूर्ण कामे,
अर्धीच राहिली वा
तुजलाच वाहतो मी, देवा मला न चिंता
हया जीवनास माझ्या मानितो यज्ञ माझा
कर्तव्य हीच पूजा मानून घे गणेशा
Comments
Post a Comment